नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : महाराष्ट्रात पहाटे झालेला शपथविधी सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आता एका विधानसभेचं अधिवेशन चक्क रात्री 2 वाजता सुरू होणार आहे. यासाठी कारण मात्र अगदीच किरकोळ आहे. हा प्रकार पश्चिम बंगालच्या विधानसभेचा आहे. फक्त एका अक्षराच्या टायपिंगच्या चुकीमुळे विधानसभेचे अधिवेशन रात्री 2 वाजता सुरू होणार आहे. झालं असं की, पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे अधिवेशन सुरू करण्यासाठी राज्यपालांना पाठवलेल्या प्रस्तावात 7 मार्च (सोमवार) दुपारी 2 PM ऐवजी 2 AM टाईप करण्यात आलं होतं. आज राज्यपाल जगदीप धनखर यांनी दुपारी राज्याच्या मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलावलं होतं, मात्र उच्चपदस्थ अधिकारी काही कारणास्तव राज्यपालांपर्यंत पोहोचले नाहीत. यानंतर राज्यपालांनी ट्विट करून मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र, रात्री दोन वाजता अधिवेशन सुरू करण्याचा प्रस्ताव आपल्याला थोडा वेगळा वाटत असल्याचे सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी ही टाईप मिस्टेक असल्याचे म्हटले आहे. राज्यपालांना ती दुरुस्त करता आली असती, पण त्यांनी चुकून रात्री 2 वाजता लिहिलेला प्रस्ताव मान्य केला असल्यानं आता विधानसभेचं अधिवेशन रात्रीच 2 ला सुरू होणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने पाठवलेल्या पहिल्या दोन नोट्समध्ये ते दुपारी 2:00 वाजता लिहिलं होतं. मात्र, नंतरच्या प्रस्तावात चुकून ते पहाटे 2:00 असं झालं, राज्यपालांनी ती चूक समजून घ्यायला हवी होती. हे वाचा - सरकारला वीज विकणाऱ्या भारतातील गावाची ‘स्मार्ट व्हिलेज’ बनण्याची रंजक कहाणी पश्चिम बंगाल विधानसभेचे कामकाज रात्री 2:00 वाजता सुरू झालं, तर देशातील अशा प्रकारची ही एक अनोखी घटना ठरेल, असंही राज्यपालांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
गुरुवारी, राजभवनाच्या वतीने, मंत्रिमंडळाचा प्रस्ताव स्वीकारताना, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्यघटनेचे कलम 174 नुसार सोमवारी म्हणजेच 7 मार्च रोजी रात्री 2 वाजता (2 AM) राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावलं असल्याचं सांगण्यात आलं. हे वाचा - Russia-Ukraine: युद्ध झाल्यास पेट्रोलच नाही अन्नही महागणार! भारतावर आर्थिक सावट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी राज्यपालांची आधीच खडाजंगी सुरू असतानाच राजभवनातून अशी असामान्य मंजुरी मिळाल्यानं बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.