इटावा, 29 मार्च: होळी हा रंगांचा सण आहे. हा केवळ भारतातचं नव्हे, तर परदेशातही साजरा केला जातो. होळी हा सण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. परंतु काही ठिकाणी होळी अशा पद्धतीनं साजरी केली जाते, हे एकूण तुम्हाला धक्का बसू शकतो. भारतात एक असं गाव आहे, ज्याठिकाणी विंचूसोबत होळी साजरी (people celebrate Holi with scorpions) केली जाते. गेल्या शेकडो वर्षांपासून गावकऱ्यांनी ही परंपरा जपली आहे. आज होळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या गावाची चर्चा होत आहे.
उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील सौंधना गावात विंचूंबरोबर होळी खेळण्याची परंपरा आहे. ऊसराहार परिसरात असणाऱ्या सौंधना गावात होळी पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी ढोलकीच्या तालावर गायन केल्यानंतर प्राचीन मंदिराच्या अवशेषातून शेकडो विंचू बाहेर निघतात. विशेष म्हणजे या खेड्यातील लहान मुलंही विंचूला तळहातावर घेवून डान्स करतात. या दिवशी विंचूही त्याचा विषारी स्वभाव सोडतो, आजच्या दिवशी तो कोणालाही दंश मारत नाही.
सौंधना गावात भैंसान देवीचं एक प्राचीन मंदिर आहे. या परिसरात मंदिराचे अवशेष पडले आहेत. होळी पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी गावातील सर्व लोक या टेकडीवर एकत्र येतात. सर्वजण ढोलकीच्या तालावर एकत्रितपणे गातात. गायनाच्या आणि ढोलकीच्या आवाजाने मंदिराच्या दगडांच्या अवशेषाखालून शेकडो विंचू बाहेर पडतात. पण यादिवशी विंचूना कोणी घाबरत नाही. विंचूंना तळहातावर घेवून त्यांच्यावर गुलाल टाकला जातो.
(वाचा- कुठे फूल, कुठे लाडू तर कुठे काठी; भारतातील होळीचे विविध रंग तुम्ही कधीच विसरणार नाही)
शेकडो वर्ष जुनी परंपरा -
परंपरेबाबत माहिती देताना गावातील कृष्ण प्रताप भदोरिया यांनी सांगितलं की, ही गावची शेकडो वर्ष जुनी परंपरा आहे. यादिवशी विंचूही आपला विषारी स्वभाव त्याग करतो. या दिवशी तो कोणालाही दंश मारत नाही. हा आगळा वेगळा उत्सव पाहण्यासाठी आसपासच्या गावातील लोकांची गर्दी जमते. गावचे जाणकार आणि प्रमुख उमाकांत यांनी सांगितलं की, ही एक आश्चर्याची घटना आहे, परंतु ही बाब आता गावातील लोकांमध्ये सामान्य झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.