उज्जैन, 23 डिसेंबर : साधारणपणे कोणत्याही मंदिराचा परिसर फार पवित्र मानला जातो. त्या ठिकाणी हार, फुलं आणि नैवेद्य हे पूजा साहित्य मिळतं. तिथं धार्मिक किंवा सामाजिक दृष्टिकोनातून निषिद्ध अशा वस्तू मिळत नाहीत किंवा विकल्याही जात नाहीत. मात्र, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून 190 किलोमीटर अंतरावर असलेलं उज्जैन येथील काळभैरव मंदिर याला अपवाद आहे. या मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उघडपणे दारूची विक्री होते. शिवाय, दर्शनाच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक भाविकाच्या हातात देशी-विदेशी दारूच्या बाटल्या नजरेस पडतात. इतकच नाही तर, येथील सरकारच्या वतीनंदेखील मंदिरात दारू भेट दिली जाते. ‘दैनिक भास्कर’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. उज्जैनच्या मंदिरातील गाभाऱ्यात सोन्याचा वर्ख असलेली काळभैरवाची स्वयंभू मूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर शिंदे राजघराण्याची लाल पगडी आहे. देश-विदेशातील लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. भैरवाला नैवेद्य म्हणून दारू अर्पण केली जाते. त्यामुळे या मंदिर परिसरात 150 रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत किमतीची दारू मिळते. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार देवासाठी दारू खरेदी करतो. काहीजाण दारूच्या चार-पाच बाटल्याही विकत घेतात. जेव्हा भाविक मूर्तीपर्यंत पोहचतो तेव्हा पुजारी त्याच्या हातातील बाटलीतील काही दारू भैरवाच्या तोंडाजवळ धरतात. विशेष म्हणजे दारूनं भरलेला ग्लास मूर्तीच्या तोंडाला लावल्यानंतर काही क्षणात रिकामा होतो. दररोज सकाळी ठीक नऊ वाजता काळभैरवाची आरती होते. ढोल आणि डमरूंच्या गजरात आरती होते. त्या पूर्वी, भैरवाला हळद, कुंकू आणि चंदन लावून दागिने घातले जातात. त्यानंतर जिलेबी आणि दारूचा नैवेद्य दिला जातो. त्यानंतरच आरतीला सुरुवात होते. महाराष्ट्रातील एका महिला भाविकानं सांगितलं की, ती सहा वर्षांपासून या मंदिरात जात आहे. देव दारू कशी पिऊ शकतो, या उत्सुकतेपोटी ती पहिल्यांदा आली होती. देव दारू पितो हे या महिलेनं प्रत्यक्ष अनुभवलं आहे. पुजारी संजय चतुर्वेदी यांचे कुटुंब गेल्या 200 वर्षांपासून या मंदिरात पूजा करतं. ते म्हणाले, भैरवाची दररोज सात्त्विक पूजा, राजसिक पूजा आणि तामसिक पूजा अशा तीन प्रकारची पूजा होते. सात्विक पूजेत फळं, फुलं, चंदन, कुंकू आणि हळद वाहिली जाते. राजसिक पूजेत दागिने अर्पण केले जातात आणि तामसिक पूजेत मद्य अर्पण केलं जातं. संजय चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैन हे, गुवाहाटी येथील कामाख्या देवीनंतर भारतातील दुसरं तंत्रपीठ आहे. काळभैरवाला शिवाचं रुद्र रूप मानलं जातं. भैरव हा महाकालाचा सेनापती म्हणून बसलेला आहे. काळभैरवला तामसी प्रवृत्तीचा देव मानलं जातं. त्यामुळेच त्याला दारूचा नैवेद्य दाखवतात. पुराणांमध्येही याचा उल्लेख आहे. पूर्वी बळीदेखील दिला जात होता. नंतर बळी प्रथा बंद झाली पण दारूची प्रथा सुरू आहे. राज्य सरकारनं येथे इंग्रजी व देशी दारूची दोन दुकानं सुरू केली आहेत. या दुकानांमधून दररोज सुमारे तीन हजार दारूच्या बाटल्या विकल्या जातात. “काळभैरव कधीपासून येथे दारूचा आस्वाद घेत आहेत हे कोणालाच माहीत नाही. ही शतकानुशतके जुनी परंपरा आहे. आमचे आजी-आजोबाही या मंदिरात पुजारी होते. ते देवाला दारू द्यायचे आणि आता आम्हीही तेच करत आहोत. पिढ्यानपिढ्या ही परंपरा सुरू आहे,” असं पुजारी म्हणाले. काळभैरव मंदिरापासून काही पावलांच्या अंतरावर विक्रांत भैरव मंदिर आहे. जे लोक तंत्र साधनेसाठी येतात, ते काळभैरवाचं दर्शन घेऊन विक्रांत मंदिरात नक्की येतात. या ठिकाणी एक मोठी स्मशानभूमी देखील आहे. या स्मशानभूमीमध्ये अघोरी आणि साधू तंत्र साधनेत मग्न असतात. येथून सुमारे 100 मीटर अंतरावर मेलडी (सती) देवीचं मंदिर आहे. तिथेही भाविकांची मोठी गर्दी असते. नैवेद्यासाठी सरकारच्या वतीनं दिले जातात 299 रुपये देवाच्या मद्यपान, पूजा, प्रसादासाठी सरकारकडून 299 रुपये वार्षिक बजेट मिळतं. वर्षानुवर्षांपासून तहसील कार्यालयातून इतकेच पैसे दिले जातात. या पैशांचा वापर करून पूजा साहित्य, ओढणी, कुंकू अर्पण केलं जातं. यानंतरच्या खर्चासाठी येथील सरकारी कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार देतात. 27 किलोमीटर परिसरात केली जाते दारूची तटबंदी दरवर्षी उज्जैनमध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी नगर पूजा होते. तेव्हा येथील सर्व देवतांना विशेष नैवेद्य दाखवला जातो. उज्जैनचे जिल्हाधिकारी येथे महालय आणि महामाया देवीला मद्य अर्पण करतात. या वेळी एका मडक्यात दारू भरली जाते. ब्राह्मण आणि पुजारी या मडक्याला अभिमंत्रित करतात. यानंतर 27 किलोमीटर परिसरात दारूची धार सोडली जाते. ही धार जिल्हाधिकारीच सोडतात. दारूच्या धारेमध्ये खंड पडणार नाही याची काळजी घेतली जाते. या प्रथेमुळे शहर सुरक्षित राहतं आणि कोणतीही आपत्ती येत नाही, असा विश्वास आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.