अहमदाबाद, 26 डिसेंबर : महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत. काही महिला याचा गैरफायदा घेतात, असं पुरुषांचं म्हणणं आहे. यावर आता न्यायालयानंही आपल्या एका निकालातून शिक्कामोर्तब केलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या मते, जर एखाद्या स्त्रीनं आपल्या पतीवर अनैतिक संबंधांचा खोटा आरोप केला तर हेदेखील एक प्रकारचं क्रौर्यच आहे.
गुजरात उच्च न्यायालयानं अशाच एका प्रकरणामध्ये एका महिलेला फटकारलं आहे. कौटुंबिक न्यायालयानं या प्रकरणातील पतीला आपल्या पत्नीपासून घटस्फोट मंजूर केला होता. कौटुंबिक न्यायालयाच्या या आदेशाविरोधात महिलेनं उच्च न्यायालयात अपील केलं होतं. हे अपील उच्च न्यायालयाने फेटाळलं आहे. उच्च न्यायालयानं सांगितलं की, कौटुंबिक न्यायालयानं घेतलेला निर्णय हा अवहेलना आणि क्रूरतेचा विचार करून घेतला आहे. त्यामुळे तो योग्य आहे. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतिज तालुक्यातील एका शाळेतील शिक्षक आणि त्यांच्या पत्नीच्या घटस्फोटाचं हे प्रकरण आहे. या जोडप्याचं 1993 मध्ये लग्न झालं होतं. दोघांना 2006 मध्ये एक मुलगा झाला. त्यानंतर पतीनं 2009 मध्ये गांधीनगरमधील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पतीने आपल्या पत्नीवर अवहेलना आणि क्रूरतेचा आरोप केला होता. पत्नीनं 2006 मध्ये मुलासोबत घर सोडलं आहे. तेव्हापासून ती परतलीच नाही, असं पतीनं न्यायालयातं सांगितलं होतं.
कौटुंबिक न्यायालयानं 2014 मध्ये पतीच्या बाजूनं निर्णय देत घटस्फोट मंजूर केला. त्यानंतर विभक्त पत्नीनं उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलं. पतीनंच आपल्याला सोडून दिलं होतं, असा आरोप तिनं केला. मात्र, पतीनं सांगितलं की, तिनं स्वतःचं घर सोडलं होतं. जेव्हा तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला तेव्हा ती परत आली. पण, तिनं त्याच्याशी आणि त्याच्या वृद्ध आईला वाईट वागणूक दिली. शिवाय माय-लेकांना आपलं वडिलोपार्जित घर सोडून गांधीनगरमध्ये राहण्यास भाग पाडलं.
हेही वाचा - मोठा पुरावा! आफताब आणि श्रद्धामध्ये नेमकं काय झालं? त्या भांडणाची ऑडिओ क्लिप हाती
पतीनं सांगितलं की, त्याचे एका महिला सहकाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत पत्नीनं एफआयआर दाखल केला होता. परंतु कौटुंबिक न्यायालयानं पतीला फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्त केलं होतं. शिवाय, घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत पत्नीनं दाखल केलेली तक्रारदेखील फेटाळून लावली होती.
याबाबत गुजरात उच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, वस्तुस्थिती अशी आहे की पती आणि त्याची आई ज्या ठिकाणी राहत आहेत ते त्यांच्या मालकीचं घर नाही. घटस्फोट होऊनही पत्नी पतीच्या घरामध्ये राहत आहे. या गोष्टी संबंधित स्त्रीच्या वागणुकीबद्दल खूप काही सांगून जातात. उच्च न्यायालयानं असंही निरीक्षण नोंदवलं की, पती किंवा पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचे खोटे आरोप करणं म्हणजे क्रूरता आहे. या प्रकरणामध्ये अशाच आरोपांमुळे पतीला तीव्र मनस्ताप, निराशा, तणाव सहन करावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Court, Divorce, Women extramarital affair