विजय कुमार, प्रतिनिधी ग्रेटर नोएडा, 17 जुलै : पाकिस्तानातून सीमापार करुन प्रियकराला भेटायला आलेली चार मुलांची आई सीमा हैदरचे प्रकरण सध्या देशात फार चर्चेत आहे. याप्रकरणी चित्रकूट येथील तुलसी पीठाधीश्वर जगदगुरू पद्मविभूषण रामभद्राचार्य महाराज यांनी मोठे वक्तव्य केले होते. या लोकांना काही कळतच नाही. इतक्या वाईट या महिला असतात, यांना लक्षात येत नाही, अशा महिलांपासून भारतीयांना सावध असले पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. दरम्यान, यानंतर आता हिंदू संघटनांनीही तिला धमकी दिली आहे. अनेक हिंदू संघटनांनी तिला ती पाकिस्तानी जासूस असल्याचा आरोप केला आहे. यामुळेच आज ग्रेटर नोएडाचे गौरक्षा दलचे राष्ट्रीय अध्यक्ष वेद नागर यांनी सीमा हैदरला 72 तासांत पाकिस्तानात पोहोचवण्याची अपील केली आहे. तसेच असे न झाल्यास सर्व हिंदू संघटनांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. गौरक्षा दलचे राष्ट्रीय अध्यक्ष वेद नागर यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ जारी केला आहे.
व्हिडिओ जारी करत ते म्हणाले की, पाकिस्तानातून चुकीच्या पद्धतीने भारतात आलेली सीमा हैदर ही एक पाकिस्तानी जासूस आहे. तसेच ती सांगते की, ती पाचवी पास आहे आणि स्पष्ट इंग्रजी बोलते. यामुळे तिच्या मनात काहीतरी वेगळे आहे, हे दिसते. तिचा भाऊ हा पाकिस्तानी आर्मीत काम करतो, असेही सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत ती पाकिस्तानची जासूस असणे नाकारता येत नाही. वेद नागर पुढे म्हणाले की, जर पुढच्या 72 तासांत पाकिस्तानी सीमा हैदरला तिच्या मुलांसमवेत तिला पाकिस्ताला परत पाठवण्यात यावे, असे आवाहन केले आहे. तसेच जर असे नाही झाले, तर मग सर्व हिंदू संघटनांसोबत मोठ्या स्वरुपात आंदोलन केले जाईल. यादरम्यान त्यांनी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालय आणि राज्य सरकारलाही विनंती केली आहे. हे देशाच्या सुरक्षेसाठी खूप धोकादायक आहे, त्यामुळे याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. सीमा हैदर उत्तरप्रदेश पोलिसांच्या ताब्यात - दरम्यान, ही पाकिस्तानी महिला सीमा हैदरला युपी पोलिसांनीही ताब्यात घेतले आहे. सोमवारी सीमा हैदरला साध्या वेशात आलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांनी तिच्या घरातून ताब्यात घेतले.