पॅरिस, 27 जून : भारतामध्ये पाऊस लांबल्याने पाणीटंचाई आणि उष्णतेच्या झळांना सामोरं जावं लागतं आहे. युरोपमध्येही उष्णतेच्या लाटेचा फटका बसला असून पॅरिसमध्ये तापमान 40 अंशावर पोहोचलं आहे. गेल्या 65 वर्षांतलं हे सर्वाधिक तापमान आहे. फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि बेल्जियम या देशांना या उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पण फ्रान्सला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
ऑगस्ट 2003 मध्ये फ्रान्समध्ये अशीच उष्णतेची लाट आली होती. या उष्णतेच्या लाटेत 15 हजार जणांचा बळी गेला होता. त्यावर्षी तापमानाने 44 डिग्रीचा आकडा गाठला होता.
फ्रान्समध्ये या आठवड्यात तरी हे वाढलेलं तापमान खाली येणार नाही, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रात्रीसुद्धा किमान तापमान 20 अंश सेल्सियसच्या वर राहील, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी पॅरिसमध्ये 900 थंड जागा तयार करण्याचं नियोजन आहे. ज्या भागात तापमान कमालीचं वाढलं आहे तिथे बागा, एसी हॉल, तात्पुरती कारंजी तयार करण्यात येणार आहेत. हवेमध्ये गारवा राहावा म्हणून मिस्ट मशिन्सही मागवण्यात आली आहेत.
पॅरिसमध्ये असलेल्या बागा रात्रीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. तिथे येऊन नागरिक उष्णतेपासून आपला बचाव करू शकतात.
पॅरिसमध्ये हा परीक्षांचाही हंगाम आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जुलै महिन्याच्या सुरुवातीला इथे होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
अटलांटिक समुद्रामध्ये उच्च दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तापमानामध्ये वाढ झाली आहे. स्पेनमध्येही तापमान 35 अंशांच्या वर जाईल, असा अंदाज आहे.
जर्मनीमध्ये बर्लिन, हॅम्बर्ग, फ्रँकफर्ट यासारख्या शहरांना उष्णतेच्या या लाटेचा फटका बसू शकतो. राजधानी बर्लिनमध्ये तर तापमान 38 अंशांच्या वर जाण्याचा धोका आहे.
=======================================================================================
SPECIAL REPORT : मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा