नूह, 19 जुलै : हरियाणाच्या नूह जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नूह जिल्ह्यात असलेल्या मेवातमध्ये डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई (DSP Surendra Singh Bishnoi) यांची खाण माफियांनी (Mining Mafia) डंपरने चिरडून हत्या केली. अरवली डोंगराजवळ खाण माफिया अवैधरित्या खाणकाम करत असल्याची खबर डीएसपींना मिळाली होती. माहिती मिळताच डीएसपी सुरेंद्र सिंह आपल्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी पोहोचले. जेथे अवैध खाणकाम केले जात होते. सुरेंद्र सिंह या वर्षी तीन महिन्यांनी हरियाणा पोलिसातून निवृत्त होणार होते, असे सांगण्यात येत आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, दुपारी 12 च्या सुमारास डीएसपी सुरेंद्र सिंह पाचगाव टेकडीजवळ त्यांच्या सरकारी वाहनाजवळ उभे होते. यावेळी त्यांनी हात देऊन दगडाची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरला थांबवण्याचा इशारा केला. हे पाहून चालकाने वाहन न थांबवता वेग वाढवला आणि पोलीस अधिकाऱ्याला चिरडत पुढे निघून गेला. या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. डीएसपीची जागीच हत्या करून आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. डंपर चालकाला पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. काँग्रेसचा खट्टर सरकारवर हल्लाबोल राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी विरोधी पक्षांनी मनोहरलाल खट्टर सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी राज्यातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. हरियाणा हे खाण माफियांचे केंद्र बनले आहे, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. सरकार आणि खाण माफिया यांच्या संगनमताने ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला. या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस खासदाराने केली आहे.
आरोपींना पकडण्यासाठी हवी तेव्हढी ताकद लावली जाणार : अनिल विज डीएसपीच्या हत्येप्रकरणी गृहराज्यमंत्री अनिल विज यांनी बेधडक खाण माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या माफियांना पकडण्यासाठी आवश्यक ती ताकद लावू, असे ते म्हणाले. त्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये फौजफाटा तैनात करावा लागला तरी आम्ही गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडू. दुसरीकडे, हरियाणा पोलिसांनी डीएसपी सुरेंद्र सिंह यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे सांगितले. कोण आहेत डीएसपी सुरेंद्र सिंह? पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डीएसपी सुरेंद्र सिंह हे हिसार जिल्ह्यातील सारंगपूर गावचे रहिवासी होते आणि सध्या ते कुरुक्षेत्र येथे कुटुंबासह राहत होते. डीएसपी सुरेंद्र सिंग 1994 मध्ये हरियाणा पोलिसात सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते आणि काही महिन्यांत ते निवृत्त होणार होते. एकाला अटक हरियाणातील नूह येथील तवाडू भागात खाण माफियांकडून डीएसपी सुरेंद्र सिंह यांची डंपरने चिरडून हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मेवात पोलिसांनी चकमकीनंतर किकर नावाच्या आरोपीला अटक केली आहे. या चकमकीत आरोपी गोळी लागल्याने जखमी झाला, त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात नेण्यात आले. मेवातच्या पोलीस अधीक्षकांनी या अटकेला दुजोरा दिला आहे.