मुंबई, 22 जुलै : जून महिन्यात स्वतःशीच लग्न (Sologamy) करणारी गुजरातची क्षमा बिंदू (Kshama Bindu) आठवतेय का? ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे तिचं हनिमून (Honeymoon). जून महिन्यात लग्न करणारी क्षमा पुढच्या महिन्यात हनिमूनसाठी गोव्याला जाणार आहे. गोव्याच्या (Goa) तिच्या सोलो हनिमूनच्या प्लॅनबद्दल तिने 'टाईम्स ऑफ इंडिया'ला माहिती दिली आहे. तिथेच ती तिचा वाढदिवसही साजरा करणार आहे.
क्षमा म्हणाली, “कोणत्याही इतर नववधूप्रमाणेच मी माझ्या हनिमूनसाठी खूप उत्सुक आहे. मी 7 ऑगस्टला गोव्यासाठी निघणार आहे. तिथले माझे सर्व खास क्षण माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड करेन. तसंच 10 ऑगस्ट रोजी माझा वाढदिवसही तिथेच साजरा करेन. मी सुंदर अशा अरम्बोल बीचवर (Arambol beach) सर्वांत जास्त वेळ घालवणार आहे. तिथे मी कुणाचाही विचार न करता बिकिनी घालू शकेन. बीचवर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गोवा हे माझं सर्वांत आवडतं आणि ड्रीम डेस्टिनेशन (dream destination Goa) आहे. तिथे मी मला विचारण्यात येणाऱ्या जोडीदाराबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार आहे,” असंही क्षमाने सांगितलं.
क्षमा आहे सज्ज!
“मी माझ्या हनिमूनला जाईन, तेव्हा लोकांना कळेल की मी विवाहित आहे आणि ते मला माझ्या पतीबद्दल नक्कीच विचारतील. तेव्हा मला सोलोगॅमी आणि मी स्वतःशीच लग्न का केलं, हे सर्व समजावून सांगण्याची संधी मिळेल.” असं बिंदू म्हणाली. “मी खूप आनंदी आहे आणि लग्नानंतर जोडपं जशी एकमेकांची काळजी घेतं, तशीच मी माझी काळजी घेत आहे. माझे मित्र आणि कुटुंबीय पाठिंबा देत आहेत. मी माझी नोकरीही बदलली आहे. माझ्याकडे काही सेव्हिंग आहे, ते मी माझ्या हनिमूनसाठी वापरेन आणि परत आल्यावर मी विवाह नोंदणीसाठी अर्ज करेन,” असं बिंदूने सांगितलं.
दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीला आपण स्वतःशीच लग्न करणार असल्याची घोषणा करून क्षमा बिंदू चर्चेत आली होती. तिने 8 जून रोजी बडोद्यातील तिच्या राहत्या घरी लग्न केलं. या वेळी तिनं मेंदी, हळद समारंभ, संगीत या सर्व कार्यक्रमांचंही आयोजन केलं होतं. लग्नातील सर्व सोहळ्यांचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. क्षमाच्या या लग्नाची देशभरात जोरदार चर्चा झाली होती. क्षमा ही स्वतःशीच लग्न करणारी पहिली भारतीय महिला आहे. तिच्या लग्नाला काही लोकांनी समर्थन दिलं होतं, तर अनेकांनी याचा विरोध केला होता. दरम्यान, लग्नानंतर तिला सुभानपुरा भागात तिचा फ्लॅट रिकामा करावा लागला होता. तिच्या घरी पाहुण्यांची ये-जा वाढल्याने नाराज शेजाऱ्यांशी तिचं भांडण झालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.