जामनगर, 8 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार गुजरातमध्ये भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल झाली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत भाजप 148 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 21 आणि आपला 9 जागांवर आघाडी मिळाली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने टीम इंडियाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. जामनगर उत्तर मतदारसंघातून रिवाबा जडेजा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सुरूवातीच्या काही राऊंडनंतर रिवाबा जडेजा पिछाडीवर आहेत. जामनगर उत्तर मतदारसंघात आम आदमी पक्षाचे कर्शनभाई करमूर आघाडीवर आहेत.
जामनगर उत्तरमध्ये आतापर्यंत आपच्या उमेदवाराला 4,582 मतं मिळाली आहेत, तर काँग्रेसच्या बिपेंद्रसिंग जडेजा यांना 2,976 आणि रिवाबा जडेजाला 2,431 मतं मिळवण्यात यश आलं आहे.
जामनगर उत्तरची ही निवडणूक देशभरात चर्चेचा विषय झाली होती, कारण रिवाबा जडेजाच्याविरुद्ध तिचेच सासरे आणि नणंद म्हणजेच रवींद्र जडेजाचे वडील आणि बहीण यांनी प्रचार केला होता. काँग्रेस उमेदवार बिपेंद्रसिंग जडेजा यांच्यासाठी जडेजाचे वडील आणि बहिणीने मतं मागितली होती. यानंतर जडेजा कुटुंबातले मतभेदही चव्हाट्यावर आले होते.
जामनगर उत्तर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. 2017 साली भाजपचे धर्मेंद्रसिंग जडेजा आमदार झाले होते, पण यावेळी पक्षाने रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाला संधी दिली.
रिवाबा जडेजा या मेकॅनिकल इंजिनिअर आहेत, 2016 साली त्यांचं रविंद्र जडेजासोबत लग्न झालं. 2019 लोकसभा निवडणुकीआधी रिवाबा जडेजा भाजपमध्ये आल्या आणि राजकारणात सक्रीय झाल्या. तीन वर्षांनंतर भाजपने जामनगरमधून रिवाबा जडेजाना संधी दिली.
रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा जडेजाने निवडणूक प्रचारादरम्यान रिवाबावर अनेक आरोप केले होते. रिवाबाने निवडणूक प्रचारात मुलांचा वापर केला, ही बालमजुरी आहे, तसंच रिवाबा सहानुभूती घेण्यासाठी मुलांचा वापर करत आहे, असा आरोप नयनाबा जडेजाने केला. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगात तक्रारही दाखल केली.
'रिवाबाचं अधिकृत नाव रीवा सिंह हरदेव सिंह सोळंकी आहे, पण जडेजा नावाचा वापर करण्यासाठी तिने कंसात रवींद्र जडेजा नाव लिहिलं आहे. लग्नाच्या सहा महिन्यानंतरही रिवाबाला नाव बदलण्यासाठी वेळ मिळाला नाही,' अशी टीकाही नयनाबा जडेजाने केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ravindra jadeja