पवन कुमार राय, साहिबगंज, 22 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक सबंधातून फसवणूक, हत्या तसेच आत्महत्या आणि बलात्काराच्याही घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराचे लग्न दुसरीकडे जुळल्यावर प्रेयसीने त्याला मिळवण्यासाठी थेट मांत्रिकाची मदत घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - साहिबगंज जिल्ह्यातील बोरीओ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोगले टोला येथे भूतबाधा करणाऱ्या अर्धा डझन लोकांना पकडण्यात आले. यानंतर त्यांना गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. तर यासोबतच या सर्वांना रात्रभर ओलीस ठेवण्यात आले. यानंतर सकाळी पोलिसांनी त्यांची सुटका करून त्यांना बोरीओ सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, तेथे सर्वांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मोहन मुर्मू उर्फ तल्लू (वय 25, रा. सोगले गाव) याने सांगितले की, मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर पडल्यानंतर बाहेर फिरत होता. त्याचवेळी गावातीलच तरुणी बड़की मुर्मू हिने त्याला बोलावले आणि तिच्यासोबत घराच्या मागे घेऊन गेली. यावेळी घराच्या मागे सहा जण तंत्र-मंत्राचा जप करत होते. तो त्याठिकाणी पोहोचला. मात्र, त्याच्यासोबत याठिकाणी धक्कादायक घटना घडली. तो याठिकाणी पोहोचताच सर्वांनी मिळून त्याला पकडले आणि आधी त्याचे केस कापले. नंतर त्याच्या बोटात अंगठी घातली. मात्र, अंगठी घालताच तो बेशुद्ध पडला. काही वेळाने तो शुद्धीवर आला. यानंतर त्याने आपल्या बोटातील अंगठी काढली आणि फेकून दिली. अंगठी काढताच त्याला बरे वाटू लागले. यानंतर त्याने गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी तंत्र-मंत्र विद्या करणाऱ्या लोकांना पकडले आणि त्यांना मारहाण केली. तसेच मंझवैय्याचा गावाचे प्रमुख तल्लू मुर्मू यांच्या ताब्यात दिले. ही बातमी पसरताच येथे मोठी गर्दी झाली. संतप्त जमाव पाहून गावाच्या प्रमुखाने सर्वांना आपल्या घरात लपवून ठेवले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्टेशन प्रभारी निरंजन कच्छाप यांच्या सूचनेवरून पोलीस पथक सोगले टोला येथे पोहोचली. यानंतर पोलिसांनी सर्वांची सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. यासोबच पोलिसांनी घटनास्थळावरुन तंत्र मंत्राचे साहित्यही जप्त केले. तर याप्रकरणी बाघमुंडीचे रागा बास्की, मरांग कुड़ी व मरांगमय मुर्मू, सोगले येथील कल्लू टुडू आणि बड़की मुर्मू, तसेच बनगावा येथील तालाकुड़ी मुर्मू यांना पोलिसांनी पकडले आहे. यातील रागा बास्की ने सांगितले की, बड़की मुर्मू हिने त्यांना तांत्रिक विद्या करण्यासाठी बोलावले होते. तर प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, बड़की मुर्मू या तरुणीचे गावातीलच मोहन मुर्मू या तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मात्र, मोहन मुर्मू याचे लग्न दुसरीकडे जुळले होते. त्यामुळे ही गोष्ट बड़की मुर्मू हिला सहन झाली नाही. त्यामुळे ती आपल्या प्रियकराला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार झाली. त्यातूनच तिने हे कांड केले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.