नवी दिल्ली, 1 मार्च : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. राज्यसभेतून (Rajya Sabha) निवृत्त झालेले वरिष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) हे या बंडाच्या केंद्रस्थानी आहेत. आझाद यांचा बालेकिल्ला असलेल्या जम्मूमध्ये काँग्रेसमधील नाराज 23 नेत्यांनी (G23) शनिवारी शक्तीप्रदर्शन केलं. त्यानंतर त्यांनी आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे.
राहुल गांधींना आव्हान
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ही जून महिन्यात होणार आहे. यावेळी राहुल गांधी पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी दावेदारी सादर करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. या निवडणुकीत आझाद यांच्या नेतृत्वाखालील नेत्यांची नाराजी उघडपणे समोर येऊ शकते. नाराज नेत्यांच्या गटानं राहुल गांधी यांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोनिया गांधींना लिहिले होते पत्र
काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पूर्णवेळ अध्यक्ष नसताना पक्षात निर्णय कोण घेते हा त्यांचा प्रश्न आहे? सोनिया गांधी तब्येतीच्या कारणामुळे पक्षाच्य रोजच्या कामकाजापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पक्षाची धूरा सांभाळणाऱ्या राहुल गांधींच्या कार्यशैलीवर या नेत्यांची नाराजी आहे.
मोदींशी मधुर संबंध
गुलाम नबी आझाद यांच्या राज्यभेतील निवृत्तीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भावुक झाले होते. या घटनेनंतर आझाद भाजपामध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरु झाली आहे. आझाद यांनी रविवारी पुन्हा एकदा मोदींची प्रशंसा करत या चर्चांचा जोर दिला आहे. ‘मी स्वत: ग्रामीण भागातील आहे. मला त्याचा अभिमान आहे. आपण चायवाला होतो, हे जाहीरपणे सांगणाऱ्या मोदींचं त्यांनी कौतुक केलं होतं. मोदींचे माझे राजकीय मतभेद आहेत. पण, ते आपला भुतकाळ लपवत नाहीत,’ असं कौतुक आझाद यांनी केलं होतं.
(वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली कोरोना लस! )
काँग्रेस काय घेणार निर्णय?
पक्षातील नाराज नेत्यांबाबत काँग्रेस पक्षातून कोणताही घाईनं निर्णय होणे अपेक्षित नाही. या नेत्यांची समजूत काढण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. या नेत्यांच्या नाराजीचा आगामी विधानभा निवडणुकांवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Gulam nabi azad, Rahul gandhi, Sonia gandhi