नवी दिल्ली, 8 एप्रिल: 1857 च्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धाची ठिणगी (1857 - War of Independence) ज्यांच्यामुळे पडली, ते वीर मंगल पांडे (Mangal Pandey) यांचा 8 एप्रिल हा हौतात्म्य दिवस. ब्रिटिश राजवटीविरोधात (British Reign) पहिल्यांदा रणशिंग फुंकणारे मंगल पांडे कोलकात्या जवळच्या बराकपूर छावणीत ‘34व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री’च्या पायदळातले1446 क्रमांकाचे शिपाई होते. त्यांच्या शौर्याची गाथा आजही गायली जाते. कारण त्यांच्याच पराक्रमामुळे भारतीय स्वातंत्र्ययुद्धाला तोंड फुटलं होतं. मंगल पांडे यांना फाशी देण्यासाठी 18 एप्रिल 1857 हा दिवस निश्चित करण्यात आला होता. पण सैन्यात भडकलेला असंतोष पाहून ब्रिटिशांनी 7 एप्रिललाच त्यांना फाशी देण्याचं ठरवलं. पण ते शक्य झालं नाही. ‘7 एप्रिल रोजी मंगल पांडे यांना फाशी देण्यासाठी बराकपूर छावणीत दोन जल्लादांना बोलावण्यात आलं होतं, मात्र आपल्या हातून मंगल पांडे यांना फाशी द्यायची आहे हे जेव्हा जल्लादांना कळलं, तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला,’ असं मंगल पांडे विचार मंचाचे प्रवक्ते बब्बन विद्यार्थी यांनी लिहून ठेवलं आहे. याचं कारण मंगलपांडे यांच्या देशभक्तीचा त्या जल्लादांवर प्रभाव होता. त्यामुळे इंग्रजांनी कोलकात्यातून (Calcutta) दुसरे जल्लाद बोलावले. पण त्यांना यायला वेळ लागल्यामुळे फाशीचा दिवस पुढे गेला. 8 एप्रिल रोजी सकाळी बराकपूर परेड ग्राउंडमध्ये पांडे यांना फाशी देण्यात आली. तेव्हापासून 8 एप्रिल हा हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
(वाचा - Explainer : कमी झालेली कोरोना रुग्ण संख्या अचानक का वाढली? समोर आलं भयाण वास्तव )
दिवाकर पांडे आणि श्रीमती अभयरानी यांच्या पोटी 19 जुलै 1827 रोजी उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) बलिया जिल्ह्यातल्या नगवा गावात मंगल पांडे यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म फैजाबादमधल्या अकबरपूर तालुक्यात झाल्याच्याही नोंदी काही ठिकाणी आढळतात.1849 साली ते ईस्ट इंडिया कंपनीच्या (East India Company) सैन्यात भरती झाले. ब्रिटिश शासनाने 1856 मध्ये एनफिल्ड नावाच्या रायफलसोबत नवी काडतुसं आणली होती. या काडतुसांचं आवरण दातांनी तोडून ती बंदुकीत भरावी लागत. या काडतुसांमध्ये गाय आणि डुकरांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता.त्यामुळे अनेक जवानांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. म्हणून त्यांनीही काडतुसं वापरण्यास नकार दिला होता. त्यामुळे फेब्रुवारी 1857 मध्ये या मुद्द्यावरून सैन्यात रोष पसरला. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी ब्रिटिशांच्या या नव्या काडतुसांना खुलेपणाने विरोध केला. इंग्रज अधिकाऱ्यांनी जेव्हा दबाव आणायचा प्रयत्न केला, तेव्हा मंगल पांडे यांनी त्यांना ठार केलं. ब्रिटिशांनी हे बंड मोडून काढलं आणि त्यांना फाशी देण्याचे आदेश 6 एप्रिल 1857 रोजी दिले. पांडे यांच्या हौतात्म्यामुळे अन्य जवान आणि देशवासीयांमध्ये ब्रिटिशांविरोधात बंड करून पेटून उठण्याची चेतना जागृत झाली. 22व्या वर्षीच सैन्यात भरती झालेल्या मंगल पांडेयांची आधीपासूनच तशी इच्छा होती, मात्र अकबरपूर ब्रिगेडमध्ये त्यांची पहिली नियुक्ती झाल्यानंतर काही वर्षांतच त्यांना ब्रिटिशांसाठी काम करणं नकोसं वाटू लागलं. काडतुसांचा मुद्दा त्यांच्यासाठी क्रांतीच्या सुरुवातीची ठिणगी ठरला. ’मारो फिरंगी को’ हा मंगल पांडे यांचा नारा इतिहासात नोंदवला गेला आहे. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धासाठी विविध राजे आणि क्रांतिकारकांनी तयारी सुरू केली होती. त्यानुसार 31 मे 1857 ला क्रांतीची मशाल पेटवली जाणार होती, मात्र पांडे यांनी दोन महिने आधीच बिगुल फुंकलं. मात्र हा नियोजनबद्ध प्रयत्न नसल्याने त्याला म्हणावा तितका पाठिंबा मिळू शकला नाही. त्यामुळे एकट्यां पांडेंना अटक करणं ब्रिटिशांना फारसं अवघड गेलं नाही. जिवंतपणे ब्रिटिशांच्या हाती न लागण्याच्या इच्छेमुळे मंगल पांडे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, मात्र ते जखमी झाले आणि इंग्रजांनी त्यांना अटक केली. तरीही त्यांनी क्रांतीच्या योजनेबद्दल किंवा आपल्या साथीदारांबद्दल कोणतीही माहिती ब्रिटिशांना दिली नाही. बंड केल्याच्या गुन्ह्यावरून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. मंगल पांडे यांनी दाखवलेल्या असीम शौर्याबद्दल आणि भारतमातेसाठी केलेल्या बलिदानाबद्दल त्यांना वंदन.