चेन्नई, 9 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (India@75) सध्या सुरू आहे. या 75 वर्षांत भारताने सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. महिलांचंही यात महत्त्वाचं योगदान असून, या अनुषंगाने नुकतीच घडलेली एक घटना अत्यंत महत्त्वाची आहे. ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ अर्थात CSIR च्या प्रमुखपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ नल्लाथंबी कलाईसेल्वी (Nallathamby Kalaiselvi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 6 ऑगस्टला त्याची घोषणा करण्यात आली. या पदावर नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत. CSIR हा देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या 38 संशोधन संस्थांचा समूह आहे. ‘एनडीटीव्ही’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लिथियम आयन बॅटरीज क्षेत्रात कलाईसेल्वी यांचं मोठं संशोधन आहे. सध्या त्या CSIRच्या तमिळनाडूमधल्या कराईकुडी इथल्या सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (CSIR-CECRI) संचालिका आहेत. शेखर मांडे यांच्यानंतर त्या CSIRचा पदभार स्वीकारणार आहेत. मांडे यांच्या निवृत्तीनंतर जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश गोखले यांच्याकडे CSIRचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कलाईसेल्वी यांच्याकडे सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च विभागाच्या सचिवपदाचाही कार्यभार असेल. CSIRच्या संचालक म्हणून त्यांची नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून 2 वर्षांसाठी किंवा पुढच्या आदेशापर्यंत, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत असेल, असं कार्मिक मंत्रालयाच्या शनिवारच्या (6 ऑगस्ट) आदेशात म्हटलं आहे. फेब्रुवारी 2019मध्ये कलाईसेल्वी CSIR-CECRI च्या प्रमुख बनल्या. त्या संस्थेच्या प्रमुख बनलेल्याही त्या पहिला महिला होत्या. त्याच संस्थेत त्यांनी अगदी प्राथमिक शास्त्रज्ञ या पदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तमिळनाडूमधल्या तिरुनेलवेली जिल्ह्यातल्या अंबासमुद्रम या छोट्याशा शहरात त्यांचं बालपण गेलं. तिथे तमिळ माध्यमातच त्या शिकल्या. मातृभाषेत शिकल्यामुळे कॉलेजमध्ये विज्ञानाच्या संकल्पना नीट समजून घेण्यास चांगला उपयोग झाला, असं त्या आवर्जून सांगतात. वाचा - India@75: 80 वर्षांपूर्वी गांधींच्या एका घोषणेने ब्रिटीशांच्या थेट मुळावरच घातला कलाईसेल्वी यांचं नॅशनल मिशन फॉर इलेक्ट्रिक मोबिलिटी या मोहिमेत मोठं योगदान आहे. आतापर्यंत त्यांचे 125हून अधिक रिसर्च पेपर्स प्रसिद्ध झाले असून, सहा पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत. प्रॅक्टिकली व्हाएबल सोडियम आयन/लिथियम-सल्फर बॅटरीज आणि सुपर कपॅसिटर्स या विषयावर त्या सध्या संशोधन करत आहेत. कलाईसेल्वी यांचं 25हून अधिक वर्षांचं संशोधनकार्य प्रामुख्याने इलेक्ट्रोकेमिकल पॉवर सिस्टीम्स (Electrochemical Power Systems) आणि त्यातही खासकरून इलेक्ट्रोड मटेरियल्स (Electrode Materials) विकसित करण्यावर आधारित आहे. ऊर्जा साठवणाऱ्या यंत्रणेत देशी इलेक्ट्रोड मटेरियल्स किती अनुकूल आहेत, याचं इलेक्ट्रोकेमिकल मूल्यमापन या विषयावर त्यांनी संशोधन केलं. (Lithium Ion Batteries) लिथियम आयन बॅटरीज, (Supre Capacitors) सुपर कपॅसिटर्स, वेस्ट टू वेल्थ ड्रिव्हन इलेक्ट्रोड्स, ऊर्जा साठवणुकीसाठी इलेक्ट्रोलाइट्स आणि इलेक्ट्रोलायटिक अॅप्लिकेशन्स आदी विषयांतही त्यांनी संशोधन केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनं हा सध्याचा कळीचा मुद्दा झाला आहे. या क्षेत्रातल्या तज्ज्ञ असलेल्या कलाईसेल्वी आता CSIR च्या प्रमुख झाल्यामुळे या विषयातल्या संशोधनाला अधिक वाव मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.