अहमदाबाद 13 मार्च : भारतीय क्रिकेट संघानी ऑस्ट्रेलिया दौरा आणि मायदेशात सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या क्रिकेट मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचा आनंद सगळीकडे साजरा होत आहे. अहमदाबादमधील कोर्टयार्ड बाय मॅरिएट या हॉटेलमध्येही (Ahmedabad Restaurant) त्याच निमित्ताने 8 आणि 9 मार्च 2021 ला ‘क्रिकेट रस’ खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवाचं वैशिष्ट्य होतं मोटेरा थाळी. जगातील सर्वांत मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमला पूर्वी मोटेरा स्टेडियम म्हटलं जायचं. या स्टेडियमवरच्या अतुलनीय कामगिरीचा आणि स्टेडियमच्या विशालतेचा सन्मान करण्यासाठी 5 फूट लांब परिघ असलेली विशाल अशी मोटेरा थाळी (Motera Thali) इथं तयार करण्यात आली होती. गुजराती पदार्थांनी सजलेल्या या थाळीसोबत एक चॅलेंजही हॉटेलनी खवय्यांना दिलं होतं. एरव्ही एखादी थाळी ठराविक वेळेत एकट्याने संपवण्याचं आव्हान रेस्टॉरंटमध्ये दिलं जातं. पण हे चॅलेंज थोडं वेगळं होतं. ही थाळी मोठी असल्याने तुम्ही मित्र, नातेवाईक यांना सोबत घेऊन ही थाळी संपवू शकता अशी सवलत होती. फक्त 4 जणांना तुम्ही सोबत घेऊन 1 तासात ही थाळी फस्त केलीत तर तुम्ही चॅलेंज जिंकलं. भारताचा माजी यष्टिरक्षक पार्थिव पटेल यानी डोक्यावर गुजराती फेटा बांधून आपल्या मित्रांसोबत हे चॅलेंज स्वीकारलं आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण चार भी कम पड जाएँगे अशीच ही थाळी दिसती. त्यामुळे पार्थिव हे चॅलेंज जिंकला का हे नक्की सांगता येणार नाही. काय होतं थाळीत? भारतीयांचं वेगेवगळ्या खाद्यपदार्थांवर जसं प्रेम असतं तसंच ते क्रिकेटवर जीवापाड प्रेम करतात आणि म्हणूनच मॅरिएटनी हे चॅलेंज आयोजित केलं होतं. या मोटेरा थाळीमधल्या पदार्थांची नावं तर बघा, धोनी खिचडी, कोहली खमण, पंड्या पत्रा, भुवनेश्वर भर्ता, रोहित आलू रसिला, शार्दुल श्रीखंड, बाउन्सर बासुंदी, हॅटट्रिक गुजराती दाल, बुमराह भिंडी शिमला मिर्च आणि हरभजन हांडवो. नावं ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. या थाळीत एवढंच नव्हतं तर सोबत स्नॅक्स, ब्रेड, अपेटायझर, डेझर्टही होतं. मग काय राव जंगी मेजवानीच की. मग काय! आम्ही म्हणालो ते बरोबर आहे की नाही? चार भी कम पडेंगे अशीच आहे ना ही थाळी? पार्थिव आणि त्याच्या मित्रांसमोर हे मोठं आव्हान होतं. त्यांनी हे पूर्ण केलं का माहीत नाही पण तुम्ही विचार करू शकता. भारतीय संघ उत्तम कामगिरी करतोय कदाचित पुन्हा एकदा अशी मोटेरा थाळी सजेल, तेव्हा तुम्ही हे आव्हान नक्की स्वीकारा .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.