कोप्पल, 22 सप्टेंबर : एका दोन वर्षांच्या मुलाने हनुमानाच्या मंदिरात (hanuman temple) प्रवेश केल्याबद्दल दलित मुलाच्या कुटुंबाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरन नावाचे व्यक्ती आपल्या मुलाच्या वाढदिवसा दिवशी गावातील हनुमान मंदिराला (hanuman temple) भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या नकळत मुलाने मंदिरात प्रवेश केला होता.
ही घटना कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील मियापूर गावात 4 सप्टेंबर रोजी ही घडली आहे. जेव्हा मुलाचे वडील चंद्रशेखरन हे बाहेर पूजेमध्ये मग्न होते, तेव्हा त्यांचा 2 वर्षांचा निष्पाप मुलगा कुतूहलापोटी मंदिराच्या आत गेला. खरंतर कुठेही मुक्तपणे फिरणे हा मुलांचा स्वभाव आहे. असे म्हणतात की मुले हे देवाचे रूप आहेत. आपल्या देशात भगवान राम आणि भगवान कृष्णाच्या बाल रूपाची पूजा केली जाते. हनुमानाच्याही बाल स्वरूपाची स्तुती गीते गायली जातात. मात्र, त्याच्याच मंदिरात अस्पृश्यतेसारख्या जुन्या वाईट प्रथेचे पालन केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
दलित मुलाच्या मंदिरात प्रवेशाबद्दल नाराजी व्यक्त करत, देशाच्या संविधानाच्या मूलभूत भावनेच्या विरुद्ध पुजाऱ्याने त्याचे वडील चंद्रशेखरन यांना जोरदार फटकारले. धक्कादायक, म्हणजे या विषयावर 11 सप्टेंबर रोजी गावात झालेल्या बैठकीत मंदिराच्या शुद्धीकरणासाठी चंद्रशेखरन यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांनी तो भरण्यास सरळ नकार दिला. गावातील काही लोकांनी वडिलांना पाठिंबा दिला. मात्र, या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे गावाच्या हद्दीतील हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.
पोलिसांचा इशारा
20 तारखेला हे प्रकरण स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर घटनेला दुजोरा दिला आहे. चंद्रशेखर यांच्या तक्रारीवर दंड ठोठावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी त्यांनी कोणाविरोधात एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत, पोलिसांनी सूओ मोटो अर्थात स्वतःची दखल घेत गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणातील 5 आरोपींना अटक केली आणि त्यांना तुरुंगात पाठवले. सध्या गावातील वातावरण शांत असून पोलीस गावातील परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
हे वाचा - धक्कादायक! अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिसांनी सुरु केला तपास
पोलीस अधिकाऱ्यांनी उच्चवर्णीय जातीच्या इतर व्यक्तींना चंद्रशेखरच्या कुटुंबाला यापुढे त्रास दिला तर त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dalit, Hanuman mandir