नवी दिल्ली, 19 मार्च : जगभरातून कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होत असतानाच आता नवीन व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) ओमिक्रॉन प्रकारानंतर (Omicron Variant) आता त्याच्या उप-प्रकार BA.2 ने दहशत निर्माण केली आहे. दक्षिण कोरियामध्ये एका दिवसात या सर्व प्रकारांची 6 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ओमिक्रॉनच्या (Omicron) या सर्व प्रकारांमुळे युनायटेड किंगडम आणि इतर युरोपीय देशांमध्ये भीती निर्माण होत आहे. वास्तविक भारतात या सर्व प्रकारांशी संबंधित धोक्याबद्दल आरोग्य तज्ञ फारसे चिंतित नाहीत. याचे सर्वात मोठे कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाढलेली प्रतिकारशक्ती असल्याचे सांगितले जात आहे.
भारतात गेल्या वर्षी डिसेंबर ते या वर्षी फेब्रुवारी दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोविड लसीकरणाचा वेग वाढला होता. महाराष्ट्रातील राज्य आरोग्य सेवेचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले की, भारतात येणारी कोरोनाची चौथी लाट आपण हलक्यात घेऊ शकत नाही. कारण, हे सर्व व्हेरिएंट जगातील अनेक देशांमध्ये पसरत आहेत. देशात कोविडची चौथी लाट कधी येईल आणि ती किती गंभीर असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे.
चीनमध्ये वर्षभरानंतर Coronaमुळे दोन मृत्यू, नव्या व्हेरिएंटनं वाढवली चिंता
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार आढळून आला होता. या प्रकारात 50 हून अधिक म्यूटेशन होते. सुरुवातीला हा प्रकार अत्यंत संसर्गजन्य असल्याने भीती निर्माण झाली. परंतु, नंतर गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे सर्व देशातील कोरोना लसीकरणामुळे घडले, ज्यामुळे मोठ्या लोकसंख्येची प्रतिकारशक्ती चांगली झाली आहे.
महाराष्ट्र कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी म्हणतात की भारतात कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता कमी आहे. इस्रायलमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूचे नवीन प्रकार देखील चिंताजनक प्रकारांच्या यादीत ठेवलेले नाहीत. म्हणूनच जोपर्यंत कोविडचा कोणताही गंभीर प्रकार समोर येत नाही, तोपर्यंत काळजी करण्यासारखे काही नाही. तरीही आपण मास्क वापरायला हवेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.