Home /News /national /

Father's Day 2020 : मुलाने मुस्लीम मुलीशी लग्न करण्याची मागितली परवानगी, गांधीजींनी पत्र लिहून अशा शब्दांत कळवला होता नकार

Father's Day 2020 : मुलाने मुस्लीम मुलीशी लग्न करण्याची मागितली परवानगी, गांधीजींनी पत्र लिहून अशा शब्दांत कळवला होता नकार

मुलाने आंतरधर्मीय लग्न करण्यासाठी परवानगी मागितल्यानंतर महात्मा गांधी यांनी लिहिलेलं पत्र काहीसं वादग्रस्तही ठरलं होतं.

    मुंबई, 20 जून : महात्मा गांधी आणि त्यांच्या मुलांचं नातं हे अतिशय नाजूक आणि वेगळं तितकंच वादाचंही होतं. सततची आंदोलनं, देश-विदेशात प्रवास आणि प्रचंड असलेल्या व्यापामुळं गांधीजींना आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देता आलं नाही. त्यामुळं त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं नातं हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. मणिलाल आणि मुस्लीम मुलगी गांधीजींचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मणिलाल याचं एका मुस्लीम मुलीवर प्रेम होतं. त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. पण गांधीजींनी या लग्नाला सक्त विरोध केला होता. गांधीजी हे सुरवातीच्या काळात आंतर-जातीय आणि आंतर धर्मीय लग्नाच्या विरोधात होते. 1930 नंतर त्यांचा हा विरोध मावळला होता. पण सुरूवातीच्या दिवसांमधल्या या भूमिकेमुळे मणिलालच्या आयुष्यात वादळ निर्माण झालं. दक्षिण आफ्रिकेतले गांधीजींचे विश्वासू सहकारी युसूफ गुल यांची मुलगी फातिमा आणि मणिलाल याचं एकमेकांवर प्रेम होतं. गुल हे आश्रमातच राहत असल्यानं लहानपणापासून ते आणि फातिमा एकमेकांना चांगले ओळखत होते आणि मित्रही होते. नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्या प्रेमाचं रूपांतर त्यांना लग्नात करायचं होतं. तब्बल 14 वर्ष त्यांची ही प्रेमकहाणी सुरू होती. लग्न करायचं दोघांनी ठरवल्यानंतर मणिलालने बापूंना परवानगी मागितली. मात्र त्यांनी परवानगी दिली नाही. तर आपल्याच जातीतल्या मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं. गांधीजी हे सुरुवातीच्या काळात आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहाच्या विरोधात होते. असं केल्याने सामाजिक सद्भावना आणि धार्मिक श्रद्धांना ठेच लागते असं त्यांचं मत होतं. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नाला विरोध हिंदू धर्मात अशा लग्नाला असलेला विरोध हा योग्यच आहे असंही त्यांना वाटतं असे. पण 1930 नंतर त्यांचं हे मत पूर्णपणे बदललं होतं. आणि जुनं टाकून नवं स्वीकारणं आणि झालेल्या चुकांची कबूली देण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे होता. बर्मिंघम विद्यापीठाचे संशोधक निकोल क्रिस्टी नॉली यांनी यावर संशोधन केलं त्याचा अहवालही प्रसिद्ध केलाय. के.आर. प्रभू आणि यु.आर. राव यांनी महात्मा गांधींचे विविध विषयांवरचे विचार एकत्र केलेत. "द माइंड ऑफ महात्मा गांधी" असं नाव त्यांनी त्याला दिलंय. त्यात गांधीजी म्हणतात '' विवाह हा आयुष्यातली सर्वात महत्वाची नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतील.'' यातल्याच एका चर्चेदरम्यान गांधीजींनी आंतर धार्मिक विवाहांना आपल्या विरोध असल्याचंही सांगितलंय. दक्षिण आफ्रिकेतल्या केप विद्यापीठातल्या इतिहासाच्या ज्येष्ठ प्राध्यापक आणि गांधींच्या खापर पणतू उमा धुपेलिया मिस्त्री यांनीही सविस्तर लिहिलं आहे. गांधीजी मान्य करतील? मणिलाल यांना विश्वास होता की आपलं टिम्मीशी (फातिमा) लग्न होईल. यासाठी ते बापू आणि कस्तुरबांना राजी करतील अशी त्यांना खात्री होती. मात्र बापू तर विरोधात होतेच मात्र कस्तुरबांनाही हे लग्न मान्य नव्हतं. आंतरधर्मीयच नाही तर आंतरजातीय विवाहालाही त्यांचा विरोध होता. आपली सून दुसऱ्या धर्माची किंवा जातीची असेल हा विचारच त्यांना पचत नव्हता. तरीही प्रेम सुरूच होतं... मणिलाल 1915 मध्ये गांधीजींसोबत भारतात आले होते. पण ते 1917 मध्येच परत गेले. फिनिक्स आश्रमाचं कामकाज बघण्यासाठी आपल्याला परत जायचं आहे असं कारण त्यांनी त्यावेळी दिलं. मात्र खरी गोष्ट ही होती की ते फातिमाचा विरह जास्त काळ सहन करू शकत नव्हते. 1914 मध्ये सुरू झालेलं त्यांचं हे प्रेम प्रकरण 1926 पर्यंत सुरू होतं. मला फातिमाशी लग्न करायचंय... मणिलालने आपला छोटा भाऊ रामदास मार्फत गांधींजींना निरोप पाठवला की ते टिम्मी (फातिमा) सोबत लग्न करू इच्छितात. त्यांना असं वाटलं की फातिमाचं कुटूंब आणि गांधी परिवारामध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळे गांधीजी त्यासाठी नाही म्हणणार नाहीत पण झालं उलटच. गांधीजींनी त्याला पत्र पाठवलं आणि त्याची निराशा झाली. आपण मित्रत्वाच्या नात्याने हे पत्र लिहत असल्याचं गांधींजींनी त्यात लिहिलं होतं. पण या एका पत्रानं मणिची सर्व स्वप्न धुळीस मिळाली. गांधीजी पत्रात लिहितात "तू हिंदू आहेत, असं असताना तू फातिमाशी लग्न केलं आणि लग्नानंतरही ती मुस्लिम राहिल्यास एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहू शकतील? असं झालं तर तू आपल्या श्रद्धा हरवून बसशील. जेव्हा तुला मुलं होती तेव्हा त्यांच्यावर कुठल्या धर्माचा प्रभाव राहिल याचा काही तु विचार केलास का?" हा धर्म नाही तर अधर्म पुढं ते लिहितात '' असं लग्न करणं हा धर्म नाही तर अधर्म असेल, फितिमा ही केवळ लग्नासाठी आपला धर्म बदलत असेल तर तेही योग्य नाही. श्रद्धा ही कापडासारखी नाही जी वाटेल तेव्हा बदलली जावू शकते. असं जो कुणी करत असेल ते घर आणि धर्मातूनही बहिष्कृत केला जाईल. असं केल्यानं त्याचा हिंदू आणि मुस्लिमांवरही चांगला परिणाम होणार नाही. हे नातं समाज हिताचं ठरणार नाही. तु देशाची सेवाही करू शकणार नाही आणि फिनिक्स आश्रमात काम करणही तुला कठिण जाईल. भारतात परतनही तुला कठिण जाईल. मी बा ला हे कसं सांगू? तिला ते सहन होणार नाही. '' गांधीजींना या लग्नाची खूप काळजी वाटत होती. या पत्रात त्यांनी शेवटी आणखी कडक भाषेत लिहिलं होतं. तू केवळ क्षणिक सुखासाठी असं लग्न करण्याचा विचार करतोयस. खरं सुख कशात आहे हे तुला माहित नाही. मणिने तोडलं फातिमाशी नातं गांधीजींच्या या पत्राचा परिणाम व्हायचा तोच झाला. मणिलालने आज्ञाधारक पुत्राप्रमाणं फातिमाला लग्नासाठी नकार दिला. आणि संबंध संपल्याचं सांगितलं. पण यासाठी मणीने बापूंना आयुष्यभर माफ केलं नाही. गांधीजींचे पणतू राजमोहन गांधी (Mohandas: A True Story of a Man, His People, and an Empire) आणि उमा धुपेलिया (Gandhi's Prisoner?: The Life of Gandhi's Son Manilal ) यांनीही आपल्या पुस्तकांमध्ये गांधीजींवर या गोष्टीसाठी टीका केला आहे. मणिलालने फातिमाशी लग्न केलं नाही. मात्र नंतर 12 वर्षांनी त्याचा मोठा भाऊ हरिलाल यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. नंतर एकच महिन्यांनी ते परत हिंदू धर्मात आले. ...आणि मणिलालचं लग्न झालं मणिलालला पत्र पाठवल्यानंतर गांधीजींनी आपले विश्वासू जमनालाल बजाज यांच्याशी मणिलालच्या लग्नाबाबत चर्चा केली त्यानंतर मणिलालचं लग्न अकोल्यातल्या एका श्रीमंत गुजराती व्यापाऱ्याच्या 19 वर्षांच्या मुलीसोबत करण्यात आलं. लग्नाच्या आधी गांधीजींनी मणिला सांगितलं की त्यानं होणाऱ्या बायकोला आधीच्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितलं पाहिजे. आता तिच्याशी काहीही संबंध नाही असं सांग असंही त्यांनी बजावलं होतं. महात्मा गांधींच्या कुटुंबाची सध्या पाचवी पिढी आहे. त्या कुटुंबातल्या सदस्यांनी अनेक धर्मांच्या मुला-मुलींशी लग्न केलीत. मात्र अजूनही मुस्लीम धर्मात लग्न झालेलं नाही. संपादन - अक्षय शितोळे
    First published:

    Tags: Fathers day 2020, Mahatma gandhi

    पुढील बातम्या