• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Farmers Protest: शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार? आंदोलनस्थळी बोलवण्यासाठी 'फिर दिल्ली चलो'ची घोषणा

Farmers Protest: शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार? आंदोलनस्थळी बोलवण्यासाठी 'फिर दिल्ली चलो'ची घोषणा

10 मे रोजी संघटनेने एक विशेष परिषदही आयोजित केली असून, त्यात देशभरातले शेतकरी नेते सहभागी होणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 एप्रिल: केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यां (New farm laws)विरोधात आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांनी (Farmers Agitation) दिल्लीच्या सीमेवर काही महिने ठाण मांडलं आहे; मात्र आता तिथे आंदोलन करणाऱ्या अनेकांचा आंदोलनातला रस संपत चालल्याने आंदोलन पुकारलेल्या शेतकरी गटांनी आता राज्याच्या विविध भागांमध्ये 'फिर दिल्ली चलो' अशी घोषणा करून आंदोलकांची संख्या वाढवायचं ठरवलं आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या (Samyukt Kisan Morcha) नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला 24 एप्रिल रोजी 150 दिवस पूर्ण होत आहेत. त्या दिवसापासून 'फिर दिल्ली चलो' (Phir Delhi Chalo) अशा नव्या घोषणेसह आंदोलनाला नवी गती दिली जाणार आहे. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी ही नवी घोषणा देण्यात आली असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. 10 मे रोजी संघटनेने एक विशेष परिषदही आयोजित केली असून, त्यात देशभरातले शेतकरी नेते सहभागी होणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वी संसदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता; मात्र त्याचा तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्याबद्दलचा निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल, असं संयुक्त किसान मोर्चाकडून सांगण्यात आलं. Oxygen तुटवडा दूर करण्यासाठी टाटांचा पुढाकार; पंतप्रधानांनी केलं कौतुक पंजाबात सध्या पिकांच्या काढणीचा /कापणीचा हंगाम (Harvesting Season) सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आपापल्या शेतात कामाला गेले असल्यामुळे दिल्ली सीमेवरच्या आंदोलक शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं. 'आता कापणीचा हंगाम संपत आला असल्यामुळे 'फिर दिल्ली चलो' या मोर्चाने शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनस्थळी आणलं जाईल,' असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. या आंदोलनात सहभागी असलेल्या बीकेयू (उग्रहण) या शेतकरी गटाने आपल्या सदस्यांना 21 एप्रिलपासून टिकरी बॉर्डरवर जमण्यास सांगितलं आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी संघटनांकडून सातत्याने असा दावा केला जात आहे, की आंदोलक शेतकऱ्यांचा उत्साह कायम असून, तो वाढत आहे; मात्र संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी मात्र आंदोलन लांबत चालल्याने थकवा आला असल्याचं मान्य केलं. 'सरकार सध्या पूर्णपणे कोविडवरच काम करताना दिसतंय आणि त्यांच्याकडून तातडीने काही चर्चा सुरू होईल, असं वाटत नाही. आंदोलन जितकं जास्त लांबेल, तितक्या अधिक शेतकऱ्यांना थकवा जाणवू लागेल,' असं एका शेतकरी नेत्याने सांगितलं. हरियाणा सरकारने आधीच शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे, की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं. कारण हरियाणा आणि पंजाबमध्ये कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे; मात्र शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी सरकार कोविडचा फायदा घेऊन आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. 'त्यांनी गेल्या वर्षीही हीच क्लृप्ती वापरली होती. या वर्षी आम्ही तसं होऊ देणार नाही,' असं यादव यांनी सांगितलं.
  First published: