राजकोट, 29 सप्टेंबर:निसर्गात औषधी (medicinal plants) गुणधर्म असलेल्या वनस्पती बऱ्याच असतात. कोरफड (Aloe vera), आवळा, कडुलिंब (neem) आदींचा वापर आपण करत असतो; पण अशी काही वनस्पतीही असतात, की ज्यांच्या गुणधर्मांबद्दल फारशी माहिती नसते. निवडुंगाच्या कुळातलं Prickly Pear हे कॅक्टस त्यापैकीच एक. त्याला काटेरी नागफणी किंवा कॅक्टस फ्रूट असं (cactus fruit) असं म्हणतात. हे फळ फायबर्सचा खजिना असून, त्यात जीवनसत्त्वं (vitamins) आणि इतर पौष्टिक घटकही मोठ्या प्रमाणावर असतात. संजय हातवानी (Sanjay Hatwani) या तरुणाने या काटेरी फळाची उपयुक्तता समजून घेतली आणि व्यवसायाची संधी हेरली. तो राजकोट ग्रामीण बँकेत काम करतो; पण त्याला शेतीत रस आहे. त्याला या फळाची उपयुक्तता कळली, तेव्हा त्याने या फळाचा रस बनवण्याचा उद्योग कुटुंबातल्या सदस्यांसह सुरू केला. याबाबतचं वृत्त 'द बेटर इंडिया'ने दिलं आहे.
संजयने सांगितलं, 'वीस वर्षांपूर्वी आमच्या गावाजवळच्या गुंडाळा या गावात हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या व्यक्तींना कॅक्टस फ्रूट सरबत दिलं जायचं. काही वर्षांनी त्यां 'गौ कृपा' नावाने कारखाना सुरू केला. या कारखान्यात आयुर्वेदिक उत्पादनं बनवली जात. मी या कारखान्यात कामाला होतो. तिथून काम शिकल्यानंतर मला हर्बल उत्पादनांचा व्यवसाय करावासा वाटला. सुरुवातीला मी आजूबाजूच्या गावात फिरून माझी हर्बल उत्पादनं विकत होतो. 2012 मध्ये मला राजकोट ग्रामीण बँकेत नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यावर व्यवसाय करणं सोडून दिलं; पण गेल्या वर्षी पुन्हा वडिलोपार्जित जमिनीवर हे काम सुरू केलं. हर्बल उत्पादनांची विक्री करण्याचा परवानाही मी घेतला आहे. नोकरी सांभाळून मी हे काम करतो.'
गुजरातमधल्या (Gujarat) राजकोट (Rajkot) जिल्ह्यातल्या जसदान भागात बहुतांश नागरिक शेती करतात; पण गावात पिकणाऱ्या कॅक्टस फळाची माहिती अनेक शेतकऱ्यांना (farmers) नव्हती. शेतात उगवणारं जंगली फळ म्हणून ते फेकून द्यायचे. संजयने नेमकं तेच हेरलं. मूळचा हिंगोलगढचा असलेल्या संजयला शेतीची आवड आहे. 'अजय नेचर फार्म' नावाने 2 हेक्टर जमिनीवर त्याची शेती आहे. तिथे तो गेल्या एका वर्षापासून 24 हून जास्त प्रकारची हर्बल उत्पादनं (herbal products) बनवतो.
संजयच्या शेतात दररोज कॅक्टस फळापासून बनवलेल्या रसाच्या 10 ते 15 बाटल्या विकल्या जातात. एका बाटलीत 600 ग्रॅम रस असतो. एका बाटलीची किंमत 150 रुपये असते. या रसाचं सेवन थॅलेसेमिया, मधुमेह यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतं. पचनसंस्थाही सुधारते. हा रस लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉल कमी करतो. एवढंच नाही तर अशक्तपणा आणि रक्ताशी संबंधित रोगांवर उपचार करण्यासाठीदेखील रस खूप प्रभावी आहे. हा रस दररोज सकाळी आणि संध्याकाळी 50 मिली पिणं आरोग्यासाठी चांगलं असल्याचं संजयने सांगितलं.
पूर्वीपेक्षा या फळाबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता दिसून येत आहे. कोरोना काळात त्याचा व्यवसाय थोडा कमी झाला होता; मात्र आता लोक त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर ते विकत घेत आहेत. फळांपासून रस बनवण्याच्या प्रकियेबाबत सांगताना संजय म्हणाला, की कॅक्टस प्रजातीची झाडं गावाच्या आसपास भरपूर आढळतात. लोक त्याला जंगली समजतात; पण तो ती झाडं वाढवतो. त्याची फळं लाल गुठळ्यांसारखी असतात. फळ आल्यानंतर त्याच्या आतून लगदा काढला जातो आणि बी वेगळं केलं जातं. त्यानंतर हा लगदा रस तयार करण्यासाठी फिल्टर केला जातो. हा रस एका विशिष्ट तापमानाला गरम केला जातो. यानंतर या रसाच्या समान प्रमाणात साखर मिसळली जाते. नंतर ते उकळलं जातं. यानंतर हा रस तयार होतो. रस थंड करून बाटलीत भरला जातो. या प्रक्रियेला सुमारे दोन ते तीन तास लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Success story