बंगळुरू 13 जुलै : टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले आहेत, काही दिवसांपूर्वी भाव न मिळाल्याने खराब होणारे टोमॅटो आता 120-200 रुपये किलो झाले आहेत. अनेकांना टोमॅटो घेणं परवडत नाहीये. पण, भाव वाढले असल्याने टोमॅटो पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही चांगली संधी ठरली आहे. टोमॅटो विकून शेतकरी लखपती झाले आहेत. कर्नाटकमधील कोलार येथील एका शेतकरी कुटुंबाने मंगळवारी टोमॅटोच्या 2,000 पेट्या विकल्या आणि बदल्यात त्यांना तब्बल 38 लाख रुपये मिळाले. या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलंय. प्रभाकर गुप्ता आणि त्यांचे भाऊ 40 वर्षांहून अधिक काळापासून शेती करत आहेत. बेथमंगला इथं त्यांची सुमारे 40 एकर जमीन आहे. प्रभाकरचे चुलत भाऊ सुरेश गुप्ता म्हणाले की ते चांगल्या दर्जाचे टोमॅटो पिकवतात. खतं आणि कीटकनाशकांबद्दल असलेल्या ज्ञानामुळे त्यांना त्यांचं पीक कीटकांपासून सुरक्षित ठेवता येतं. टोमॅटोत अवतरले गणपती बाप्पा! नारायणगाव बाजार समितीतील त्या टोमॅटोनं वेधलं लक्ष दोन वर्षांपूर्वी 15 किलोच्या बॉक्ससाठी गुप्तांना टोमॅटोची सर्वांत जास्त किंमत 800 रुपये मिळाली होती. मंगळवारी, त्यांना 15 किलोच्या बॉक्ससाठी दुप्पटीपेक्षा जास्त म्हणजेच तब्बल 1,900 रुपये मिळाले. कोलार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटो पिकवणं सोडून दिलं, कारण दिवसेंदिवस ते स्वस्त होत होते. पण ज्यांनी टोमॅटो पिकवणं सुरू ठेवलं, त्यांना आता चांगला मोबदला मिळतो आहे. चिंतामणी तालुक्यातील व्याजकुर गावातील टोमॅटो शेतकरी व्यंकटरमण रेड्डी यांनी मंगळवारी 15 किलोची पेटी 2,200 रुपये दराने विकली. दोन वर्षांपूर्वी टोमॅटोची किंमत 900 रुपये प्रति 15 किलो बॉक्स होती, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी एक एकरात टोमॅटोचं पीक घेतलं होतं आणि मंगळवारी 54 पेट्या कोलार येथील एपीएमसी मार्केटमध्ये आणल्या होत्या. 36 पेट्यांचे त्यांना प्रतिबॉक्स 2,200 रुपये मिळाले, तर उर्वरित पेट्यांचा लिलाव 1,800 रुपये प्रतिबॉक्सने करण्यात आला. त्यातून त्यांना 3.3 लाख रुपये मिळाले. एपीएमसी कोलार येथील केआरएस टोमॅटो मंडईचे सुधाकर रेड्डी म्हणाले की, पुरवठा कमी झाला आहे, त्यामुळे दर वाढले आहेत. मंगळवारी त्यांच्या मंडईत टोमॅटोचा लिलाव 2,200 ते 1,900 रुपये 15 किलोच्या प्रतिबॉक्स दराने झाला. नोव्हेंबर 2021 मध्ये 15 किलोच्या बॉक्सचा 2,000 रुपयांना लिलाव झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. आता त्यांनी कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलण्याची अधिकाऱ्यांना विनंती केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.