नवी दिल्ली, 24 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली, त्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द केली गेल्याचं लोकसभा सचिवालयाने सांगितलं आहे. ‘सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे? असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं, त्यानंतर त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी एक कागद फाडलेला फोटो व्हायरल झाला. या फोटोसह असा दावा केला जात आहे की दहा वर्षांपूर्वी त्यांनी अध्यादेश फाडला नसता तर त्यांची खासदारकी आज रद्द झाली नसती. दरम्यान, हा फोटो आणि फोटोसोबत करण्यात येत असलेला दावा दोन्हीही खोटे आहे. राहुल गांधी यांनी २०१३ च्या पत्रकार परिषदेत खासदारांचे सदस्यत्व वाचवणारा अध्यादेश फाडल्याचा दावा फोटो शेअर करताना केला जात आहे. पण हा फोटो २०१३ च्या पत्रकार परिषदेतील नसून २०१२ च्या सभेतील आहे. याचा व्हिडीओसुद्धा समाजमाध्यमावर आणि युट्यूबवर आहे. २०१२ मध्ये लखनऊत झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी सपा आणि बसपा यांच्या आश्वासनावर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी सपा आणि बसपाच्या आश्वासनांची यादी फाडल्याची चर्चा होती. पण त्यावर काँग्रेस नेत्यांची नावे असल्याचं समोर आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







