सावधान! जूनमध्ये दिसणार कोरोनाचा सर्वात धोकादायक टप्पा, तज्ज्ञांनी भारताला दिला इशारा

सावधान! जूनमध्ये दिसणार कोरोनाचा सर्वात धोकादायक टप्पा, तज्ज्ञांनी भारताला दिला इशारा

भारतात मे महिन्यात रुग्णांची वाढलेली संख्या हा लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याचा परिणाम असू शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : भारतात कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 6 हजार 977 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत देशात 1 लाख 38 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत नवीन रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. शुक्रवारी 6 हजार नवीन प्रकरणं समोर आली होती तर शनिवारी 6 हजार 654 आणि 6 हजार 767 नवीन रुग्णांची नोंद झाली. मात्र आज देशात सर्व रेकॉर्ड मोडत, चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली.

गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत देशाला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं चौथ्या टप्प्यात नियम शिथिल करण्यात आले. मात्र त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झालेली पाहायला मिळाली. दरम्यान येत्या काही आठवड्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते जूनमध्ये नवीन रुग्णांच्या संख्येत सर्वात जास्त वाढ होऊ शकते.

असा आहे इतर देशांचा कोरोना पॅटर्न

कोरोना रुग्णांची वाढ होत असली तरी भारताला त्याचा धोका नसेल. कारण भारतातील मृत्यू दर हा खूप कमी आहे. दरम्यान जगभरातील तज्ज्ञांनी कोरोनाच्या या पॅटर्नचा अभ्यास केला आहे. यानुसार एकदा हा ग्राफ वाढल्यानंतर दोन महिन्यात रुग्णांची संख्या जास्त असते, मात्र त्यानंतर हा ग्राफ खाली आला आहे. इरानमध्ये मार्च महिन्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण होते. मात्र एप्रिलनंतर रुग्णांची संख्या कमी झाली. दरम्यान भारतात मे महिन्यात रुग्णांची वाढलेली संख्या हा लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याचा परिणाम असू शकतो.

जुलैपर्यंत 21 लाख लोकांना होणार कोरोना

मिशिगन युनिव्हर्सिटी (University of Michigan) आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं (Johns Hopkins University) कोरोना मॉडेलद्वारे चेतावणी दिली आहे की, जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतात 21 लाख लोकांना संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत सरकारच्या अडचणी वाढू शकतात. तर, लॉकडाऊनचे नियम आणखी कडक होऊ शकतात. मिशिगन युनिव्हर्सिटी ऑफ बायोस्टॅटिस्टिक्सचे आणि रोग तज्ज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी एजन्सी रॉयटर्सला याबाबत सांगितले. भारतातील परिस्थिती येत्या काळात आणखी गंभीर होऊ शकते, अशी माहिती तयार केलेल्या मॉडेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. भ्रमर मुखर्जी यांनी सांगितले की, भारतात अद्याप संसर्गाचे प्रमाण कमी झालेले नाही, सरकारी आकडेवारीनुसार भारतात कोरोनाची प्रकरणं 13 दिवसांनी दुप्पट होत आहेत.

भारतासाठी चिंता वाढवणारी स्थिती

जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि मुखर्जी यांच्या टीमनं भारतातील आरोग्य सेवा आणि रुग्णालयात कमी बेड व व्हेंटिलेटरबाबत चिंता व्यक्त केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार सध्या भारतात रूग्णालयात सुमारे 7 लाख 14 हजार बेड आहेत, तर 2009 मध्ये ही संख्या सुमारे 5 लाख 40 हजार होती. संसर्गाच्या संख्येत पहिल्या 10 देशांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक आहे. तर त्यानंतर ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की यांचा क्रमांक लागतो.

First published: May 25, 2020, 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading