• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • 'कलम 370 बद्दल सरकारला दोष दिल्याचा पश्चात्ताप' काश्मिरी माजी सनदी अधिकाऱ्याला उपरती

'कलम 370 बद्दल सरकारला दोष दिल्याचा पश्चात्ताप' काश्मिरी माजी सनदी अधिकाऱ्याला उपरती

सचिन तेंडुलकरच्या #IndiaTogether च्या ट्वीटला उत्तर देत 'घर की बात घर मे रहनी चाहिये' असं शाह फैजल (Shah Faesal) यांनी लिहिलं आहे. काश्मीरबाबतचं 370 वं कलम रद्द केल्याबद्दल सरकारला लक्ष्य करणं चुकीचं होतं, असा पश्चात्तापही आता या माजी सनदी अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

  • Share this:
आदित्य राज कौल नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी: भारतातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेची पॉपस्टार रिहाना (Rihanna) हिने ट्वीट केल्यानंतर भारतातील काही दिग्गजांनी #IndiaTogether ही मोहीम ट्विटरवर सुरू केली. 2010 साली नागरी सेवा परीक्षेत देशात पहिला आलेला जम्मू-काश्मिरातील तरुण सनदी अधिकारी शाह फैझलही (Shah Faesal) त्यात सहभागी झाला आहे. फैजल यांनी सनदी सेवेतून राजीनामा देत राजकारणात उडी घेतली होती. त्यांनी काश्मीरच्या स्वतंत्र अस्तित्वासंदर्भातलं कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारविरोधात थेट भूमिका घेत मुलाखतही दिली होती. आता मात्र मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar tweet) केलेलं ट्विट रिट्विट करून शाह फैजलने 'घर की बात घर के अंदरही अच्छी' अशा शब्दांत आपलं मत मांडलं आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला (Jammu-Kashmir) विशेष अधिकार देणारं कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर शाह फैझलने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीतून मोदी सरकारवर टीका केली होती. आता याविषयी 'ती टीका म्हणजे चूक होती का, त्याबद्दल काही वैषम्य वाटतंय का', असा प्रश्न News18 तर्फे शाह फैजलना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, 'होय खरंच. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर जगभरातल्या नागरिकांशी बोलताना शब्द जपूनच वापरले गेले पाहिजेत.' 14 ऑगस्ट 2019 रोजी शाह फैझल यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीवरून वाद उत्पन्न झाला होता. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्यासंदर्भात त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 'या निर्णयामुळे आपल्या सर्वांना विचारांची एक स्पष्टता आली आहे. माझ्या आजोबांच्या पिढीच्या वेळी 1953मध्ये जम्मू-काश्मीरच्या पंतप्रधानांना एका छोट्या पोलिस काँस्टेबलने अटक केली होती. माझ्या आजोबांची पिढी त्यापासून दूर गेली आणि त्यांचा विश्वासघात झाला. माझ्या वडिलांच्या पिढीत 1987मध्ये जम्मू-काश्मिरात निवडणुका झाल्या. त्यात फसवणूक झाली आणि माझ्या वडिलांच्या पिढीचा विश्वासघात झाला. त्यामुळे तिथली लोकशाही संपुष्टात आली आणि काश्मिरात 1988मध्ये बंडखोरीचा उदय झाला. आता (कलम 370 हटविणं) हा नवा अपमान आहे. पाच ऑगस्ट 2019 रोजी सुरू झालेल्या नीचपणामुळे माझ्या पिढीलाही विश्वासघाताची चव मिळाली. येत्या 50 ते 70 वर्षांत त्याचा कसा परिणाम होईल, याबद्दल आत्ता तरी काही सांगता येणार नाही,' असं वक्तव्य फैझल यांनी त्या मुलाखतीत केलं होतं. तुम्ही आता फुटीरतावादी होणार का, असा प्रश्न त्या वेळी मुलाखतकाराने फैझलना विचारला होता. हार्वर्ड विद्यापीठातून (Harvard) शिकलेल्या फैझल यांनी जानेवारी 2019मध्ये भारतीय नागरी सेवेचा (Indian Administrative Service) राजीनामा दिला होता. त्या वेळी त्याने जी फेसबुक पोस्ट लिहिली होती, ती व्हायरल झाली होती. उत्तर काश्मिरातल्या कुपवाडात (Kupwara) फेब्रुवारी 2019मध्ये एक भाषण देऊन त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याच वर्षी मार्च महिन्यात जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (Jammu Kashmir People's Movement) नावाचा राजकीय पक्ष त्याने स्थापन केला होता. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शाह फैझल यांनी नुकत्याच दिलेल्या कबुलीमुळे ते पुन्हा सनदी सेवेत परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लडाखच्या नायब राज्यपालांचा सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक होऊ शकते, अशी बातमी पसरवली जात आहे. कारण फैझल यांना सुरक्षेच्या कारणास्तव काश्मिरात राहायचं नाही. सरकारी सूत्रांनी मात्र या सगळ्या अफवाच असल्याचं स्पष्ट केलं आहे. सनदी सेवेचा फैझल यांनी दिलेला अधिकृत राजीनामा अद्याप कार्मिक विभागाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे सूत्रांचं असं म्हणणं आहे, की सरकारने अद्याप या प्रकरणात अंतिम निर्णय घेतलेला नसल्यामुळे येत्या काही महिन्यांत हे प्रकरण पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाकडे जाऊ शकतं आणि तिथेच त्यावर अंतिम निर्णय होऊ शकतो. असं काही ठरल्यास वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडून तीव्र विरोध होऊ शकतो. कारण त्यामुळे चुकीचा पायंडा पडू शकतो, असं सूत्रांचं म्हणणं आहे. (आदित्य राज कौल हे ज्येष्ठ पत्रकार असून News18 समूहाचे Contributing Editor आहेत.)
First published: