सतना, 2 मे : मध्यप्रदेश राज्यातील सतना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इकॉनॉमिक ऑफेन्स सेल (EOW) रीवाच्या पथकाने रविवारी पहाटे 5 वाजल्यापासून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कनिष्ठ शास्त्रज्ञ सुनील कुमार मिश्रा यांच्या मारुती नगर येथील घरावर छापा टाकला. (EOW Raid in Satna) या कारवाईत तब्बल सात कोटींहून अधिक संपत्ती मिळाली आहे. त्यांच्यावर सरकारी सेवेत असताना उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता कमावल्याच्या तक्रारी आणि आरोप करण्यात आले होते. यानंतर EOW रीवाच्या टीमने त्वरीत कारवाई केली. यात सात कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आढळून आल्या आहेत.
2020 मध्ये रसायनशास्त्रज्ञ पासून कनिष्ठ शास्त्रज्ञ
मीडिया रिपोर्टनुसार, सुनील कुमार मिश्रा हे 1990 मध्ये सतना येथील प्रदूषण नियंत्रण मंडळात लॅब असिस्टंट पदावर होते. 2006 मध्ये त्यांची केमिस्ट पदावर बढती झाली. यानंतर 2020 मध्ये कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून पदोन्नती झाली. EOW ने सुनील कुमार मिश्रा यांचे या सरकारी नोकरीतील पगाराचे उत्पन्न आतापर्यंत फक्त 60 लाख रुपये असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, त्यांच्याजवळ तब्बल 7 कोटींहून अधिक रुपयांची सपत्ती असल्याचे कागदपत्र जमा करण्यात आले आहेत.
EOW निरीक्षक मोहित सक्सेना आणि प्रवीण चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखालील 25 सदस्य या कारवाईत सहभागी झाले. आधी त्यांनी सुनील कुमार मिश्रा यांच्या घराला आणि गल्लीला घेराव घातला आणि नंतर छापा टाकला. EOW टीमला सुनील कुमार मिश्रा यांच्या घरी जमिनीची कागदपत्रे, सोने-चांदी, रोख रक्कम, वाहने आणि अनेक बेनामी मालमत्ता सापडल्या. सतना येथील प्रदूषण नियंत्रण मंडळात ज्युनियर सायंटिस्ट म्हणून नियुक्त सुनील कुमार मिश्रा यांचे घर सतना येथील मारुती नगर येथील गल्ली क्रमांक 7 मध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
तपासात नेमकं काय सापडलं?
>> रोख - 30,30,860 रुपये
>> सोने-चांदीचे दागिने – किंमत 8,18,725 रुपये
>> 21 बँक खाते आणि 4 विमा पॉलिसी
>> 29 नोंदणी दस्तऐवज - किंमत 1,75,54,203
>> दोन मजली घर - किंमत 37,50,000
>> तीन चारचाकी वाहन आणि तीन दुचाकी वाहन - किंमत 50 लाख
>> 3,82,72,742 रुपयांच्या जमीन खरेदी करारासह 35 नग विक्री करार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Raid