म्हैसूर (कर्नाटक), 26 जुलै : म्हैसूरमधला दसरा हा जगप्रसिद्ध सोहळा असतो. तो सोहळा पाहायला अक्षरशः लाखो पर्यटक तिथे उपस्थित असतात. या सोहळ्याची सांगता ‘जंबू सावरी’ या भव्यदिव्य सोहळ्याने होते. त्यात चामुंडेश्वरी देवीची मूर्ती हत्तीच्या पाठीवरच्या अंबारीत ठेवली जाते आणि हत्तींची मिरवणूक म्हैसूरच्या रस्त्यांवरून काढली जाते आणि दहा दिवसांच्या सोहळ्याची सांगता होते. अत्यंत मनोवेधक असा हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. 2022मध्ये मात्र एका वाईट कारणासाठी हा सोहळा चर्चेत आला होता. सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीत हत्तींचा जो गट सहभागी होणार होता, त्या गटातल्या लक्ष्मी नावाच्या एका हत्तिणीने सोहळ्याच्या काही दिवस आधी एका पिल्लाला जन्म दिला. लक्ष्मीच्या मूत्रात रक्त आढळल्याचं तिची काळजी घेणाऱ्या काही जणांना आढळलं होतं आणि त्यामुळे तिच्या मूत्राचे नमुने परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते; मात्र परीक्षणाचे निष्कर्ष येण्याआधीच लक्ष्मीने म्हैसूर पॅलेसच्या आवारात एका गोंडस पिल्लाला जन्म दिला होता.
या हत्तिणीच्या गर्भारपणाचा काळ अंतिम टप्प्यात असूनही त्याबद्दल संबंधितांना काहीच कल्पना नव्हती आणि तशाच स्थितीत तिला अत्यंत कठीण असं प्रशिक्षण देण्यात आलं, यावरून प्राणी हक्क कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी राज्य सरकार, तसंच वन खात्याला धारेवर धरलं. या पार्श्वभूमीवर, यंदा दसऱ्यासाठी हत्ती निवडण्याआधी केल्या जाणाऱ्या तपासण्यांमध्ये हत्तिणींची प्रेग्नन्सी टेस्टही समाविष्ट करण्यात आली आहे. हत्ती प्रकल्पाच्या संचालक आणि अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक सरस्वती मिश्रा यांनी या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. सध्या भीमनकट्टे एलिफंट कॅम्पमध्ये 9 हत्तींची तपशीलवार आरोग्य तपासणी प्रक्रिया सुरू आहे. बांदीपूरजवळच्या रामपुरा कॅम्पमधल्या हत्तींचीही लवकरच तपासणी करण्यात येईल. राज्यातल्या ठिकठिकाणच्या एलिफंट कॅम्प्समधल्या हत्तींच्या आरोग्यासंदर्भातले आणि फिटनेसचे अहवाल आले, की त्यातून चालू महिनाअखेरीपर्यंत 14 हत्तींची अंतिम यादी बनवली जाईल. ती यादी दसरा सोहळ्याशी संबंधित व्यक्तींचा समावेश असलेल्या संबंधित समितीकडे पाठवली जाईल. त्या यादीवर शिक्कामोर्तब झालं, की त्या हत्तींना प्रशिक्षणासाठी नेलं जाईल. प्रशिक्षणाचा कालावधी 45 दिवस ते 2 दोन महिने इतका असतो. सर्वसाधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात हत्तींची वाहतूक केली जाते. म्हैसूर सर्कलच्या मुख्य वनसंरक्षक मालती प्रिया यांनी या संदर्भात माहिती दिली. ‘दसऱ्याच्या सोहळ्याच्या अनुषंगाने हत्तींची वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य तपासणी केली जाते. त्यात आतापर्यंत प्रेग्नन्सी टेस्ट्सचा समावेश नव्हता. यंदा पहिल्यांदाच हत्तिणींच्या मूत्राचे आणि रक्ताचे नमुने घेऊन त्या गर्भवती आहेत की नाहीत, याचीही तपासणी केली जाणार आहे. निवड प्रक्रियेत हत्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं जातं. माथिगोडू, भीमनकट्टे, रामपुरा आणि दुबारे या कॅम्प्समध्ये आरोग्य तपासणीची शिबिरं घेतली जात आहेत. हत्तींच्या आरोग्याच्या स्थितीनुसार अंतिम यादी तयार करून ती आम्ही जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत सरकारला पाठवू,’ असं त्यांनी सांगितलं.