पाटणा 15 नोव्हेंबर: बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) काँग्रेस आणि आरजेडीच्या महाआघाडीचा पराभव झाला. यात सर्वात वाईट कामगिरी होती ती काँग्रेसची. आता राष्ट्रीय जनता दलाने राहुल गांधींवर (Rahul Gandhi) पराभवाचं खापर फोडलं आहे. पक्षाचे जेष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार सुरू असताना राहुल गांधी शिमल्यात प्रियंका गांधी यांच्या घरी पिकनिकवर होते असं तिवारी यांनी म्हटलं आहे. अशा पद्धतीने पक्ष चालवला जावू शकत नाही. राहुल गांधी यांना गांभीर्य नव्हतं असच त्यांनी सूचित केलं आहे. काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळेच बिहारमध्ये महाआघाडीला सत्तेपासून दूर राहावं लागलं असा आरोपही अनेक नेत्यांनीही केला आहे. अशा पद्धतीने पक्ष चालू शकत नाही. त्यामुळे भाजपलाच फायदा होत असल्याचं मतही तिवारी यांनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधी यांच्यावर सातत्याने ते गंभीर नसल्याचा आरोप होत असतो. त्यांच्या धोरणार सातत्य नाही. ते गंभीर नाहीत, त्यांच्या धोरणांमध्ये स्पष्टता नाही असंही सातत्याने म्हटलं जातं. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांनीही आपल्या पुस्तकात राहुल गांधी यांचा उल्लेख नर्व्हस राजकारणी, फारसा उत्साह नसलेले असा केला आहे. त्यामुळे देशात चांगलच वादळ निर्माण झालं होतं.
#WATCH: RJD leader Shivanand Tiwari speaks on #BiharResults, says "...elections were in full swing & Rahul Gandhi was on picnic at Priyanka ji's place in Shimla. Is party run like that? Allegations can be levelled that manner in which Congress is being run, it's benefitting BJP." pic.twitter.com/ZZXmndMJFh
— ANI (@ANI) November 15, 2020
दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची सोमवारी शपथ घेणार (CM Nitish Kumar) आहेत. एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. तर भाजपमध्ये नाराजी नाट्याला सुरूवात झाल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी जे ट्विट केलं त्यावरून ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. कार्यकर्ता हे पद आपल्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर उपमुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर राजनाथ सिंग आणि नितीश कुमारांनी कुठलंही स्पष्ट उत्तर दिलं नसल्याने सस्पेंस वाढला आहे. भाजपचे तारकिशोर प्रसाद (Tarkishore Prasad) आणि रेणु देवी (Ranu Devi) यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पक्ष जी जबाबदारी देईल तो योग्य पद्धतीने पार पाडणार असल्याचा विश्वास किशोर यांनी व्यक्त केला. भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी तार किशोर प्रसाद यांची निवड करण्यात आली. मोदी यांनीच त्यांचं नाव सुचवलं. तर उपनेतेपदी नाम रेणु देवी यांची निवड करण्यात आली. भाजपच्या बैठकीत सुशील कुमार मोदी यांनी दिलेलं भाषण हे निरोपाचं भाषण दिल्यासारखं होतं असं म्हटलं जात आहे. भाजप आणि संघ परिवाराने मला खूप काही दिलं. एवढं कदाचित कुणालाच मिळालं नसेल. या पुढे जी जबाबदारी दिली जाईल त्याचं मी पालन करणार आहे. कार्यकर्ता हे पद माझ्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.