नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता अध्यक्ष गांधी कुटुंबातील होणार की बाहेरचा याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दिग्गज नेता गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर, काँग्रेस आणि त्यांच्या पुढील अध्यक्षांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होत असताना पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची (CWC) रविवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या नूतन अध्यक्ष आणि पक्षाच्या पुढील अध्यक्षांच्या निवडीच्या तारखांबाबत चर्चा करण्यात आली. सोनिया गांधी यांनी व्हर्च्युअली उपस्थित राहून बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वॉड्राही उपस्थित होते. विशेष म्हणजे सोनिया गांधी सध्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेश दौऱ्यावर असून राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत आहेत. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे ढकलली होती. काँग्रेसने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की, या वर्षी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान आपल्या नवीन अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. वाचा - काँग्रेसमधील राजीनाम्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार? गुलाम नबी आझाद यांनी केला मोठा खुलासा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा काँग्रेस अध्यक्ष होण्यासाठी जाहीरपणे आग्रह केला आहे. मात्र, या विषयावर अनिश्चितता कायम आहे. त्याचवेळी राहुल गांधी आपण एआयसीसी अध्यक्ष होणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याचे पक्षातील अनेक सूत्रांचे म्हणणे आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.