नवी दिल्ली, २८ मार्च : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा बेहिशेबी संपत्ती प्रकरणी चांगलेच अडचणीत आले आहेत. अमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने पटियाला हाऊस कोर्टामध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्या हंगामी जामीन याचिकेला विरोध केला आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आमच्याकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे आम्हाला कोठडीत त्यांची चौकशी करायची आहे, असं ईडीचे वकील डी. पी. सिंह यांनी कोर्टाला सांगितलं. याआधी, रॉबर्ट वाड्रा हे चौकशीसाठी सहकार्य करत नाहीत, असं ईडीने पटियाला हाऊस कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर कोर्टाने वाड्रा यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर कोर्टाने त्यांचा जामिनाची मुदत २५ मार्चपर्यंत वाढवली होती. तब्बल ७ सात चौकशी बेहिशेबी संपत्ती प्रकरणी वेगवेगळ्या प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांची अनेक वेळा चौकशी झाली आहे. एकदा तर वाड्रा यांची सलग सात तास चौकशी झाली. परदेशामध्ये बेकायदा संपत्ती प्रकरणी ही चौकशी झाली. शस्त्रास्त्र व्यवहार करणारे एजंट संजय भंडारी यांच्याबरोबर त्यांचे व्यावहारिक संबंध आणि त्यातून मिळणाऱ्या नफ्याबदद्लही त्यांची चौकशी झाली. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून चौकशी करण्यात येतेय. त्यावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. त्यामुळे वाड्रा यांच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, असं वाड्रा यांनी याआधी म्हटलं होतं. त्यांच्या चौकशी प्रकरणावरून भाजप नेत्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावरही ताशेरे ओढले. पण काँग्रेसला विनाकारण लक्ष्य केलं जातंय, असं या नेत्यांचं म्हणणं आहे. ======================================================================================================================= माधुरी आणि श्रीराम नेने यांची UNCUT मुलाखत; पाहा काय म्हणाल्या ‘15 ऑगस्ट’बाबत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.