नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : राज्यसभेच्या रिक्त जागांवर पोटनिवडणुकीची (Rajya Sabha by polls election) घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा समावेश आहे. एकूण सहा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. 4 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून याच दिवशी निकाल सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यसभेच्या एकूण सहा रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. तर मध्यप्रदेशातील एका जागेचा, पश्चिम बंगालमधील एका जागेचा, तमिळनाडूमधील दोन रिक्त जागांचा समावेश आहे.
राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते खासदार राजीव सातव यांचं काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळं निधन झालं. राजीव सातव हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते. त्यामुळे आता गुजरात काँग्रेस प्रभारी पदी कोणाची नेमणूक होणार याकडं नेते मंडळींचं लक्ष लागलं आहे. सातव यांच्या निधनाने दोन पदे रिकामी झाली आहेत. राज्यसभेतील सदस्यत्व आणि गुजरात काँग्रेस प्रभारी, या दोन्ही जागेवर काँग्रेसमधील नेते आता फिल्डिंग लावत आहेत.