नवी दिल्ली 13 एप्रिल : सर्व देशात कोरोनाचा कहर सुरू असताना राजधानी दिल्ली आज पुन्हा एकदा भूकंपाने हादरली. आज दुपारी पुन्हा धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.7 एवढी होती. मात्र त्याची फारशी जाणीव झाली नाही. रविवारी सायंकाळीही भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या 24 तासांमधला हा भूकंपाचा दुसरा धक्का आहे. दिल्ली आणि परिसरात हे धक्के जाणवले. रविवारच्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 एवढी होती. दिल्लीसह उत्तर भारतातल्या अनेक शहरांना हे धक्के जाणवले. मात्र कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. सायंकाळी 5.50 मिनिटांनी हे धक्के जाणवले. लॉकडाऊनमुळे सगळे लोक घरात होते. भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेक लोक घरांमधून बाहेर आले.
सर्व लोक सुरक्षीत असतील. घाबरण्याचं कारण नाही असं ट्वीट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. तर कोरोना सुरू आहे. तो कमी म्हणून की काय आता भूकंप आला. देवा तुझ्या मनात आहे तरी काय असं ट्वीट उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केलं होतं.
जगाला बसला कोरोनाचा धक्का
कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत जगभरात 1 लाख 14 हजार 215 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. अमेरिका आणि युरोपातील देशांना कोरोनाने हादरून सोडले आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे सर्व देशांनी विमानसेवा बंद केल्या आहेत. केवळ परदेशात अडकलेल्या लोकांना त्यांच्या मायदेशी घेऊन जाण्यासाठी विशेष सेवा दिली जाते. मात्र भारतात अडकलेल्या अमेरिकन नागरिकांनी मायदेशी जाण्यास नकार दिला आहे. 800 अमेरिकन नागरिकांना मायदेशी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र त्यांनी मायदेशी परतण्यास नकार दिला.
Earthquake with magnitude 2.7 hits Delhi
— Press Trust of India (@PTI_News) April 13, 2020
याआधी भारताने ब्रिटनच्या नागरिकांना मायदेशी पाठवण्यासाठी विशेष चार्टड विमान पाठवले होते. तर, ऑस्ट्रेलियाच्या 444 नागरिकांना विशेष विमानाने मायदेशी पाठवण्यात आले. अमेरिकेने सुद्धा आपल्या नागरिकांना मायदेशी घेऊन जाण्यासाठी व्यवस्था केली होती. मात्र या नागरिकांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली. याचे कारण आहे, अमेरिकेत होत असलेला कोरोनाचा उद्रेक.