दिल्ली, 28 मे : रविवारी दुपारी जम्मू काश्मीरपासून ते अफगाणिस्तानच्या काबूलपर्यंत भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भारतात जम्मू काश्मीर ते हिमाचल प्रदेशापर्यंत भूकंपाची तीव्रता जाणवली. या भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा हा धक्का इतका मोठा होता की लोक भीतीमुळे घरातून बाहेर रस्त्यावर आणि मोकळ्या ठिकाणी आले होते. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 220 किमी खोलवर होते. अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमाभागापासून 71.17 डिग्री पुर्वेला आणि 36.64 डिग्री उत्तरेला हा केंद्रबिंदू होता. युरोपीय भूमध्य भूकंप केंद्राने सांगितले की, अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसला. फैजाबादपासून ७० किमी अंतरावरील शहरात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याचा परिणाम जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही जाणवला. दिल्ली आणि आजूबाजुच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणतीही जिवित किंवा वित्त हानी झाल्याचं समोर आलेलं नाही. चंदिगढसह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागत भूकंपाचा परिणाम दिसून आला. हे धक्के सौम्य स्वरुपाचे होते. भूकंपानंतरचा धक्का 11 वाजून 23 मिनिटांनी बसला. त्यानंतर काही वेळ धक्के जाणवत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.