नवी दिल्ली, 11 मे: काही राजकीय नेत्यांची भाषणं डोळ्यात अंजन घालणारी असतात, पुढचा रस्ता दाखवणारी, मनाला भिडणारी आणि भविष्याचा वेध घेणारी ही भाषणं आजूबाजूच्या जगण्यातली खरी मेख सांगून जातात. अशाच काही नेत्यांपैकी एक म्हणजे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee). वाजपेयी यांचे विचार आजच्या काळातही उपयोगी पडणारे आहेत. सध्या कोरोनाव्हायरसमुळे देशाची दैना उडाली आहे. दुसऱ्या लाटेने देशाची आर्थिक घडी विसकटणार आहे ती वेगळी, सध्या जिवाची चिंता आहे अशी परिस्थिती आहे.
कोरोनाचं थैमान सुरू असतानाच सोशल मीडियावर अनेक वर्षांपूर्वीचा अटलबिहारी वाजपेयी यांचा एक VIDEO व्हायरल (Atal bihari Vajpayee speech video) झाला आहे. कोरोना साथ काळात कुठे एकमेकांना मदतीचा हात देणारे माणुसकीचे झरे दिसत आहेत, कुठे स्वतःची पर्वा नकरता रुग्णसेवेसाठी झटणारे कोरोना वॉरिअर्स दिसत आहेत तर कुठे त्याच वेळी औषधांचा काळा बाजार करणारे आणि माणुसकी विकून खाणारेही दिसत आहेत. अशा वेळी अटलबिहारी वाजपेयींचा कैक वर्षांंपूर्वीचा हा VIDEO आणि त्यातले शब्द खरे असल्याचं प्रत्यंतर येतं.
हर्ष गोएंका यांनी अटलजींच्या भाषणाचा एक भाग असलेला video शेअर केला आहे. 'पैसे सें दवा खरीदी जा सकती हैं स्वास्थ्य नहीं खरीदा जा सकता' असं यात वाजपेयी सांगतात. 'भौतिक सुखं पैशाने विकत घेता येतात. वैज्ञानिक प्रगतीने माणूस वेगवेगळी शिखरं पादाक्रांत करतो पण या धरतीवर कसं चांगल्या पद्धतीने जगायचं हे त्याला उमगत नाही. हे शिक्षण, हे संस्कार कोण देणार?' असं कविमनाचे वाजपेयी विचारतात.
Such words of wisdom from Atal ji..... pic.twitter.com/lzJycnszl4
— Harsh Goenka (@hvgoenka) May 10, 2021
'आपण वर्तमानात जगतोय, पण आपल्याला भविष्याकडे बघावं लागेल', असं सांगत वाजपेयींनी जणू भविष्यकाळातल्या या भयंकर साथीला उद्देशूनच असं म्हटल्याचं वाटतं. आपण गोवर, क्षय या रोगांवर विजय मिळवला. अगदी चंद्रापर्यंत पोहोचलो. पण इथे पृथ्वीवर जिवंत कसं राहायचं कसं जगायचं हे अजून कळत नाहीये', असं अटलजी सांगतात. भौतिक समृद्धीत सुख आहे का हे शोधावं लागेल, असाही सल्ला ते देतात.
'मनात दुःख, भीती, पीडा असेल... बैचैनी असेल तर साक्षात कुबेराची संपत्तीसुद्धा सुखाचा आनंद देणार नाही', हे आज अगदी प्रत्येकाच्या मनातले अनुभव ते उद्धृत करताना दिसतात. विज्ञान जीवन समृद्ध करतो तसं विनाशसुद्धा करू शकतो, असंही वाजपेयींनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.