मराठी बातम्या /बातम्या /देश /महिला डॉक्टरने दवाखाना बंद करून सुरू केला पाणीपुरीचा गाडा; कारण ऐकून बसेल धक्का!

महिला डॉक्टरने दवाखाना बंद करून सुरू केला पाणीपुरीचा गाडा; कारण ऐकून बसेल धक्का!

रुग्णालय बंद करून महिलेने सुरू केला पाणीपुरीचा गाडा

रुग्णालय बंद करून महिलेने सुरू केला पाणीपुरीचा गाडा

महिला डॉक्टरने आपला दवाखाना बंद करून चक्क पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केल्यानं, या डॉक्टर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Jaipur, India

  जयपूर, 27 मार्च : मागील आठवड्यात राजस्थान विधानसभेत आरोग्य हक्क विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकातील महत्त्वाची बाब म्हणजे खासगी रुग्णालयांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर मोफत उपचार करावे लागणार आहेत. सर्वसामान्यांना वेळेवर चांगले उपचार मिळावेत, यासाठी या विधेयकामध्ये विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र, या विधेयकातील तरतुदींना डॉक्टरांचा विरोध असून, त्यांनी सुरू केलेलं आंदोलन अद्यापही सुरूच आहे. ‘आज तक’ने या बाबत वृत्त दिलंय.

  राजस्थानमध्ये आरोग्य हक्क विधेयकाविरोधात आंदोलन अद्यापही सुरूच आहे. डॉक्टर या विधेयकाविरोधात वेगवेगळ्या स्वरुपाचे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. सीकर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही डॉक्टरांचं धरणं आंदोलन सुरू आहे. तर, इथेच दोन डॉक्टर बेमुदत उपोषणाला बसलेत. संपामुळे खासगी रुग्णालयंही गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. 3 महिला डॉक्टरही या विधेयकाच्या निषेधार्थ उपोषणाला बसल्या आहेत. दुसरीकडे, सीकरच्या खिचड रुग्णालयाबाहेर डॉ. अनिता चौधरी यांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलंय. त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या बाहेर पाणीपुरीचा स्टॉल लावला असून आता संसार चालवण्यासाठी असा काहीतरी व्यवसाय करावा लागेल, असे त्या सांगतात.

  उपोषण सुरूच 

  सीकर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन डॉक्टरांनी सुरू केलेल्या उपोषणाचा शनिवारी (26 मार्च 2023) तिसरा दिवस होता, असं डॉ. पंकज चौधरी यांनी सांगितलं. उपोषणाला बसलेल्या दोन्ही डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी शनिवारी आणखी 4 डॉक्टर उपोषणाला बसले. या चार डॉक्टरांपैकी 3 महिला डॉक्टर आहेत. जोपर्यंत राज्य सरकार आरोग्य हक्क विधेयक मागे घेत नाही, तोपर्यंत राज्य सरकारच्या या विधेयकाविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील, असं या वेळी डॉ. भारती यांनी सांगितलं. विशेष म्हणजे एका महिला डॉक्टरने तर चक्क या विधेयकाचा निषेध करण्यासाठी पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला आहे. या विधेयकामुळे आमच्यावर हीच वेळ येऊ शकते असं या महिला डॉक्टरने म्हटलं आहे.

  जयपूरमध्ये आंदोलनाचा इशारा 

  तसंच हे विधेयक मागे न घेतल्यास डॉक्टर त्यांच्या कुटुंबीयांसह जयपूरमध्ये महाआक्रोश रॅली काढून आंदोलन करतील, असंही स्पष्ट करण्यात आलंय. राज्य सरकारच्या आरोग्य हक्क विधेयकाच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सीकर शहरात बाईक रॅलीसुद्धा काढली. एस.के.स्कूल मैदानापासून निघालेली ही बाइक रॅली बजरंग कांता, बिस्कोप, राणी सती, बहाड सर्कल, महामंत्री रोड, घंटाघर, सुरजपोळ गेट, जत बाजार, स्टेशन रोड, कल्याण सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली . डॉक्टरांनी आंदोलन सुरू केल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत.

  काय आहे डॉक्टरांची मागणी?  

  राज्य सरकारनं आणलेलं आरोग्य हक्क विधेयक मागे घेण्यात यावं, अशी डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे. या साठी गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलंय. विधेयक मंजूर झाल्यानंतर डॉक्टरांनी खासगी रुग्णालयं बंद केली. आरोग्य हक्क विधेयक मागे घेईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात सरकार काही कारवाई करणार का? आंदोलन सुरू असेपर्यंत सरकार राज्यातील जनतेसाठी आरोग्याच्या दृष्टीने कोणती पर्यायी यंत्रणा उभारणार का? याकडे लक्ष लागले आहे.

  First published:
  top videos

   Tags: Protest