वडोदरा, 15 नोव्हेंबर : देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे घरापासून दूर असलेल्या रुग्णांना किंवा रुग्णालयात असलेल्यांना आपल्या नातेवाईकांना भेटता येत नाही. अशा कोव्हिड सेंटर्समध्ये देखील दिवाळी साजरी करण्यात आली आहे.
शनिवारी जगभरात दिवाळी साजरी करण्यात आली त्याच वेळी कोव्हिड सेंटरमध्ये देखील ऊर्जा आणि उत्साहाचं वातावरण तयार करण्यासाठी छान दिव्यांनी रोषणाई करण्यात आली. घरापासून दूर असलेल्या रुग्णांसाठी कोव्हिड सेंटरमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये डॉक्टर आणि नर्स देखील सहभागी झाल्या होत्या. गुजरातच्या वडोदरामध्ये सयाजीराव रुग्णालयातील दिवाळी साजरी करतानाची खास दृश्यं कॅमेऱ्या कैद झाली आहे. रुग्णालयात उपस्थित कोरोना रूग्णांनी डॉक्टरांसह दिवाळी साजरी केली.
दिवाळीच्या दिवशी वृद्ध आणि रुग्णांनी दिवे लावले. दिवाळीची गाणी ऐकली त्यावर डान्स देखील केला. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. इथल्या रुग्णांना घरी नसल्याची उणीव जाणवू दिली नाही. रुग्णांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी गुजरातमध्ये 1 हजार 124 नवीन रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर कोरोनामुळे 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.