नवी दिल्ली, 20 जानेवारी : यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राजधानी दिल्लीत एक अपघात झाला आणि या अपघाताने देशाला हादरवून सोडलं. दिल्लीत अंजली सिंह नावाच्या एका तरुणीचा अपघात झाला होता. त्यानंतर एका कारने तिला 12 किलोमीटर फरफटत नेलं होतं. कंझावाला भागात घडलेल्या या घटनेला आज 20 दिवस पूर्ण झाले आहेत. पण याचा तपास दिवसेंदिवस भरकटत आहे.
अंजलीच्या मृत्यूनंतर इतक्या दिवसांनी पोलिसांनी बुधवारी या प्रकरणात आयपीसीचं कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाचा तपास खुनाच्या अनुषंगानेही केला जाईल. पण, या प्रकरणी पोलिसांनी एक चूक लपवण्यासाठी अनेक चुका केल्याचं समोर आलंय. तसेच या प्रकरणात गेल्या 20 दिवसांच्या तपासानंतर अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.
नवीन वर्षाच्या पहाटे घडली घटना
राजधानी दिल्लीतील कंझावाला भागात 31 डिसेंबर 2022 आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री ही घटना उघडकीस आली. या रात्री दिल्ली पोलिसांनी राजधानीच्या प्रत्येक कोपऱ्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचा दावा केला होता. पण त्याच रात्री आरोपींच्या कारने अंजलीच्या स्कूटीला धडक दिली. त्यानंतर अंजली गाडीखाली अडकली आणि आरोपी तिला 12 किलोमीटरपर्यंत गाडीखाली फरफटत घेऊन गेले. अंजलीचा मृत्यू होईपर्यंत ते तिला गाडीखाली ओढत घेऊन गेले होते.
अत्यंत वाईट अवस्थेत सापडला होता अंजलीचा मृतदेह
अंजलीचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत सापडला होता. तिचा मृतदेह पाहून कुणालाही धक्का बसेल, अशी त्याची अवस्था झाली होती. तिच्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब रस्त्यावर वाहिला होता. तिच्या कमरेतून हाडं बाहेर आली होती, तिचे पाय आणि गुडघे पूर्णपणे घासून गेले होते. तिच्या कवटीचे दोन तुकडे झाले होते. तिचा मेंदू कुठेतरी रस्त्यावर पडला होता. तिच्या शरीरावर जखमांच्या इतक्या खुणा होत्या की पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना त्या अनेक वेळा मोजाव्या लागल्या. तिचा चेहरा तर ओळखणंही फार कठीण झालं होतं. अंजलीला कारखाली जिवंत ओढलं गेलं होतं, पण तिचा मृतदेह मांसाशिवाय नुसता सापळ्यासारखा सापडला होता. तो धूळ आणि घाणीने माखला होता.
पोलिसांच्या माहितीत अनेकदा झाला घोळ
जेव्हा दिल्ली पोलीस या प्रकरणाबाबत माहिती देण्यासाठी पहिल्यांदा मीडियासमोर आले तेव्हा त्यांनी सांगितलं की, अपघाताच्या रात्री अंजली एकटीच स्कूटीवरून घराकडे जात होती. तेव्हा समोरून आलेल्या मारुती बलेनो कारने तिला धडक दिली. अंजली स्कूटीसह खाली पडली आणि गाडीखाली अडकली. त्या कारमध्ये पाच जण होते. मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा आणि मिथुन अशी पोलिसांनी त्यांची ओळख पटवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजलीला जेव्हा फरफटत नेण्यात आलं तेव्हा दीपक गाडी चालवत होता. पण पोस्ट मॉर्टेमपूर्वीच आऊट डिस्ट्रिक्टच्या डीसीपींनी कॅमेऱ्यासमोर म्हटलं होतं की अंजलीची हत्या किंवा बलात्कार झालेला नाही. त्यांनंतर पोलिसांनी 1 जानेवारी रोजी दिवसभरात आरोपींची कार जप्त केली आणि आरोपीना अटक केल्याचा दावाही केला होता.
2 जानेवारी 2023
डीसीपींच्या वक्तव्यानंतर, दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त सागरपीत सिंग हुड्डा यांनी सुमारे 26 तासांनंतर मीडियाशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं होतं की अंजलीच्या मृतदेहाचे पोस्ट मॉर्टेम करण्यासाठी डॉक्टरांच्या टीमसह एक बोर्ड तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जेणेकरून पोस्ट मॉर्टेम रिपोर्टवर कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही. यानंतर पोलीस पोस्ट मॉर्टेम रिपोर्टची वाट पाहत राहिले.
अपघाताची भीषणता पाहता हे प्रकरण संपूर्ण देशातील माध्यमांमध्ये गाजू लागले, त्याच रात्री गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र पाठवलं. ज्यामध्ये या प्रकरणाचा संपूर्ण तपास तात्काळ करण्यात यावा आणि या तपासाची जबाबदारी वरिष्ठ आयपीएस अधिकारी शालिनी सिंह यांच्याकडे देण्यात यावी, असं आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आदेशाप्रमाणे तपास सुरू झाला.
3 जानेवारी 2023
2 जानेवारीला दुपारनंतर अंजलीचे पोस्ट मॉर्टेम सुरू झालं. 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट पोलिसांना मिळाला. यात अंजलीच्या मृत्यूचं कारण गंभीर जखमा असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच अंजलीवर बलात्कार झाला नसल्याचेही म्हटलं होतं. याबाबत डीसीपींनी अपघाताच्या दिवशीच अंजलीचा बलात्कार झाला नसल्याचा दावा केला होता.
पोलिसांनी पुन्हा बदलली कहाणी
घटनेच्या पाच दिवसांनंतर म्हणजेच 5 जानेवारीला पोलिसांनी या प्रकरणाची कहाणी पुन्हा बदलली. त्यापूर्वी पोलिसांनी दावा केला होता की, अंजलीला खेचणाऱ्या कारमध्ये चालकासह 5 आरोपी होते. आता त्यादिवशी पोलिसांनी कारमध्ये चालकासह फक्त 4 जण असल्याचं सांगितलं. घटनेच्या रात्री गाडी अमित नाही तर दीपक चालवत होता. पण अपघाताच्या वेळी दीपक त्याच्या घरीच होता, असंही पोलिसांनी नंतर सांगितलं होतं.
एवढंच नाही तर पोलिसांनी नवीन ड्रायव्हरचं नाव तसेच आणखी दोन नवीन आरोपींचा खुलासा केला. अंकुश आणि आशुतोष हे आणखी दोन आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अंकुश आणि आशुतोष यांनी पोलिसांची दिशाभूल केली होती आणि अपघाताच्या वेळी गाडी दीपक चालवत असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. कारण आरोपींकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं आणि दीपककडे होतं.
पुन्हा एकदा कहाणीत निधीची एंट्री
पोलीस या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज गोळा करत असताना एका फुटेजमध्ये पोलिसांना दिसलं की अंजली नवीन वर्षाची पार्टी करून पहाटे 1.45 वाजता हॉटेलमधून बाहेर पडली होती. अंजलीसोबत आणखी एक मुलगीही दिसली. त्यानंतर दोघीही स्कूटीवर एकत्र जाताना दिसतात. पूर्वी स्कूटी अंजलीची मैत्रीण चालवत होती. नंतर अंजली स्कूटी चालवताना दिसते. यासोबतच अपघाताच्या वेळी अंजली आणि तिची मैत्रीण दोघीही स्कूटीवर होत्या, अशीही माहिती समोर आली होती. मात्र या घटनेनंतर तिची मैत्रीण अंजलीला तिथेच सोडून घरी गेली होती.
निधीने अपघाताबद्दल काय सांगितलं होतं
आज तकच्या टीमने निधीचा शोध घेतला आणि तिच्याशी संवाद साधला. तिने सांगितलं की, दोघीही नवीन वर्षाच्या रात्री एकत्र होत्या, एका हॉटेलमध्ये त्यांची रूम बुक केली होती. रात्री उशिरापर्यंत दोघीही तिथेच होत्या. त्यांनी पार्टी केली होती. त्यांच्या रुममध्ये त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं. त्यानंतर अचानक त्यांच्यात भांडण झालं, शिवीगाळ झाली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवल्यावर दोघीही हॉटेलच्या बाहेर आल्या आणि नंतर तिथून निघून गेल्या मग हा अपघात झाला.
या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार
अंजलीच्या अपघाताला आता 20 दिवस उलटले आहेत. पण अजुनही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. हे 10 प्रश्न कोणते, जाणून घेऊयात.
1. नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या रात्री सुलतानपुरी ते कंझावला या 12 किमी अंतरावर एकही पोलीस किंवा पोलीस नाका का नव्हता?
2. पोलिसांनी या घटनेला आधीच दुर्घटना का म्हटलं? त्यांना कशाची घाई होती?
3. कारमधील आरोपींपैकी एक भाजपा नेत्याचा मुलगा असल्याचं पोलिसांना आधीच माहीत झालं होतं? आरोपींच्या संख्येबद्दल पोलीस गोंधळात का होते?
4. अंजलीबरोबर दुसरी मुलगी स्कूटीवर होती, हे कळाल्यावर तिच्यापर्यंत पोहोचायला पोलिसांना इतका वेळ का लागला?
5. या प्रकरणात सुरुवातीपासून निधीची भूमिका संशयास्पद होती, पण तरीही ती अचानक केसबाहेर कशी गेली?
6. ज्या पैशांसाठी अंजलीबरोबर निधीचं घटनेच्या दिवशी हॉटेलमध्ये भांडण झालं ते पैसे कशाचे होतो? कुठून आले? यावर पोलिसांचं मौन का?
7. त्या रात्री सर्व आरोपी नशेत वेगाने कार चालवत होते, तर निधीनेच अंजलीला कारसमोर धक्का दिला नाही ना?
8. निधी झोपडीत राहायची, नंतर ती ड्रग्सच्या धंद्यात आली, आग्रा जेलमध्येही गेली, तर तिने ज्या 18 लाख रुपयांचं घर घेतलं, ते पैसे तिच्याजवळ कुठून आले, तिला पैसे कुणी दिले?
9. आता या प्रकरणात खुनाचे कलम म्हणजेच आयपीसी कलम 302 लागू केल्यानंतर सर्व सात आरोपी त्याच्या कक्षेत येतील का? की कारमधील चार आरोपींनाच हे कलम लागू होणार?
10. घटना घडली त्या दिवशी निधी नशेत होती का? पोलिसांनी तिची चौकशी की की नाही?
निधीच्या मित्राचा जबाब
या प्रकरणात पोलिसांवर प्रश्न उपस्थित होत असताना निधीचा एक मित्र समोर आला. अंजलीने त्यादिवशी आपल्याला फोन करून त्या हॉटेलमध्ये बोलावलं होतं, पण आपण गेलो नाही. नंतर एका मुलाला तिने बोलवायला पाठवलं. हॉटेलमध्ये दोन रुम बूक होते, एकामध्ये मुलं होते, तर दुसऱ्या रुममध्ये निधी-अंजली होत्या. अचानक त्यांचं पैशांवरून भांडण झालं. निधी अंजलीजवळ पैसे मागत होती. नंतर निधी रागात खाली गेली आणि गोंधळ घातला. अंजलीने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्रीच्या दीड वाजता त्या दोघी तिथून निघून गेल्या होत्या.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी उपस्थित केला प्रश्न
अंजलीच्या मित्राने निधीच्या कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली होती. तसेच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही पोलिसांनी निधीचा फोन जप्त न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. अंजलीच्या मृत्यूला 20 दिवस झाले आहेत. दिल्ली पोलिसांची 18 पथकं या प्रकरणाचा तपास करत आहेत. आता याप्रकरणी आयपीसीचे कलम 302 लागू झाल्यानंतर पोलिसांना नव्याने तपास करावा लागणार आहे. मात्र अंजलीच्या मृत्यूचे सत्य कधी समोर येणार हा प्रश्न अद्याप कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi latest news, Delhi News, Delhi Police