नवी दिल्ली, 5 जून : मागील एका आठवड्यापासून दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. दिल्लीत चाचणी करण्यात येणाऱ्या प्रत्येक चारपैकी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह निघणाऱ्या रुग्णांची टक्केवारीही वाढली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
दिल्लीतील ईशान्य दिल्ली, दक्षिण पूर्व दिल्ली या जिल्ह्यांमध्ये अपेक्षेपेक्षा खूप कमी चाचण्या करण्यात आल्या. मात्र, या जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण खूप जास्त आहे. हे प्रमाण 38 टक्क्यांपेक्षाही जास्त असून, प्रत्येक पाच व्यक्तींपैकी दोन जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राजधानी दिल्लीतील सर्वच 11 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झालेला असून, दक्षिण पूर्व जिल्ह्यात पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण जास्त आहे. दक्षिण पूर्व दिल्लीत 38.8 टक्के, ईशान्य दिल्लीत 38.6 टक्के, पश्चिम दिल्लीत 38 टक्के, उत्तर पश्चिम दिल्लीत 36.7 टक्के आणि पूर्व दिल्लीत 34 टक्के असं पॉझिटिव्हीटी प्रमाण आहे.
दरम्यान, दिल्लीत एकादिवसामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत पहिल्यांदाच मुंबईपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत 1276 नव्या रुग्णांची भर पडली तर दिल्लीमध्ये ही संख्या 1513 इतकी होती. गेल्या आठवड्यात दिल्लीत सातत्याने प्रतिदिन एक हजार रुग्णांची वाढ होत आहे. त्याआधी प्रतिदिन वाढ सुमारे 800 रुग्णांपर्यंत मर्यादित होती. दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या 23 हजार 645 झाली असून त्यापैकी 9542 रुग्ण बरे झाले आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आसीएमआर) प्रतिदिन नमुना चाचण्यांची क्षमता वाढवली असून 498 सरकारी तर, 212 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये नमुना चाचण्या केल्या जात आहेत. आत्तापर्यंत 42 लाख 42 हजार 718 नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्ली या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांत सर्वाधिक वाढ होत असली तरी बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, नागालँड, मिझोराम आणि सिक्कीम या राज्यांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus