लखनऊ, 01 एप्रिल : उत्तर प्रदेशात (uttar pradesh) कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) पहिला मृत्यू झाला आहे, तोदेखील तरुणाचा. आतापर्यंत कोरोनाव्हायरसमुळे वृद्ध व्यक्तींचा मृत्यू होत होता. मात्र आता हा व्हायरस तरुणांचाही जीव घेत असल्याचं दिसत नाही. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेला देशातील हा सर्वात तरुण रुग्ण आहे.
गोरखपूरच्या बीआरडी रुग्णालयात या तरुणावर उपचार सुरू होते. केजीएमयूमध्ये रुग्णाचे स्वॅब नमुने पाठवण्यात आले होते. त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं होतं. बुधवारी त्याचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाव्हायरसमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.
First death due to #COVID19 reported in Uttar Pradesh: Government official
उत्तर प्रदेशातील एकूण कोरोनाग्रस्त रुणांची संख्या शंभरी पार गेली आहे. गौतम बुद्धनगर भागात आणखी 2 नवी प्रकरणं आढळलीत, त्यामुळे या भागात आता 41 आहे. तर गोरखपूर आणि आग्रामध्येही प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तसंच बुलंदशहरमध्ये 2 रुग्ण आहेत. 14 रुग्ण बरे झालेत.
याआधीही मध्य प्रदेशात 35 वर्षांच्या आणि बिहारमध्ये 38 वर्षांच्या तरुणाचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातही एकाच दिवसात 2 तरुण रुग्णांचा जीव या व्हायरसने घेतला. यामध्ये मुंबईतील 40 वर्षीय महिला आणि बुलढाण्यातील 45 व्यक्तीचा समावेश आहे.
देशभरात दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे खळबळ
या परिषदेनंतर कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. 2000हून अधिक लोकं या परिषदेला हजर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातील 441 लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली आहे. आता या परिषदेमध्ये सामिल झालेल्या आणखी एकाचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. या परिषदेमुळे झालेला हा आतापर्यंतचा 10वा मृत्यू आहे. याआधी 6 लोकांचा तेलंगणात तर मुंबई, कर्नाटक आणि जम्मू काश्मीरमध्ये एकाचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशातील 156 जण या परिषदेत सहभागी झाले होते.
भारतात कोरोनाव्हायरसचे एकूण 1,397 रुग्ण आहेत. त्यापैकी 1238 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 124 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जगभरात कोरोनाव्हायरसची 8,57,957 प्रकरणं आहेत. तब्बल 42,139 रुग्णांचा या व्हायरसने बळी घेतला आहे.