राजकोट, 17 मे : देशभरात एकीकडे कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोना विरुद्धच्या कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, आरोग्य सेवकांवर वांरवार हल्ले होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. गुजरातमधील राजकोट परिसरात पोलीस आणि संतप्त जमावामध्ये धुमश्चचक्री झाली. 85 टक्के कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या जंगलेश्वर गावात संतप्त लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. जंगलेश्वर इथे सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे या परिसर सील करण्यात आला होता. शनिवारी रात्री उशिरा 400 लोक घरातून बाहेर निघाले होते. याची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांची कुमक घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी हा जमाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पण चिडलेल्या लोकांनी पोलिसांवरच हल्ला केला. हाणामारी आणि पोलिसांवर तुफान दगडफेक कऱण्यात आली.
संतापलेला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराचा मारा केला आणि लाठीचार्ज केला. जमाव ऐकत नाही हे पाहून पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. त्यानंतर काहीवेळानं परिस्थिती नियंत्रणात आली. जमावानं केलेल्या दगडफेकीत अनेक पोलिसांच्या गाड्यांचं नुकसान झालं आहे. देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 4 हजार 987 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत देशभरात कोरोनाचा आकडा 90 हजार 927 वर पोहोचला आहे. त्यापैकी 53, 946 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. संपादन- क्रांती कानेटकर