हैदराबाद, 24 जुलै: देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर ESI रुग्णालयाच्या स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आक्रोश केला होता. जवळपास 50 हून अधिक कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेवर तेलंगणाचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. के. रमेश रेड्डी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वाहतुकीचा आणि मनुष्यबळाचा अभाव असल्यानं एकाच ठिकाणी 50 हून अधिक कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचं स्पष्टीकरण रेड्डी यांनी दिलं.
तेलंगणात कोरोनाचं थैमान सुरू आहे. अशातच हैदराबादच्या एरगडॅडा स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 50 हून अधिक रुग्णांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहतूक आणि पालिका अधिकारी अपुरे असल्यानं त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे नागरिकांनी संतापाची भावना व्यक्त केली होती.
तेलंगणा आरोग्य विभागाकडूनही यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची ही एका दिवसातली संख्या नव्हती. 3 दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह रुग्णालयात होते. वाहतुकीच्या अभावामुळे हे करण्याची वेळ आल्याचं रेड्डी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.