लुधियाना, 18 एप्रिल: कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आरोग्य सेवा, पोलीस अधिकारी रात्रंदिवस आपली ड्युटी करत आहेत. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे पंजाबमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) अनिल कोहली यांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील रुग्णालयात कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरली आहे. 52 वर्षांच्या कोहली यांना 8 एप्रिल रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. उपचारादरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कोहली यांना बरं वाटतं नसल्यानं रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी त्यांच्या छातीचा एक्स-रे काढण्यात आला आणि काही चाचण्या करण्यात आल्या. तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट झालं. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारांना तेवढा प्रतिसाद मिळत नसल्यानं चिंता व्यक्त केली जात होती. शनिवारी दुपारी अखेर त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या निधनामुळे पंजाब पोलिसांमध्ये शोकाकुल वातावरण आहे.
देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आतापर्यंत 14 हजारवर पोहोचली आहे. त्यामध्ये 9 महिन्यांचा चिमुकलाही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 14, 378 एकूण आकडा झाला आहे. आतापर्यंत 480 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 991 रुग्णांना या व्हायरसवर यशस्वी मात दिली आहे. संपादन- क्रांती कानेटकर