मुंबई, 23 ऑगस्ट : देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पण कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जारी करून देण्यात आलेल्या गाइडलाइन्स नुसारचं साजरा केला जात आहे. पण तरीही कोरोनाचं विघ्न अद्यापही दूर झालं नाही. ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा संसर्गाचा वेग वाढला असून दिवसाला साधारण 70 हजाराच्या आसपास नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सलग दुसऱ्या दिवशी देखील 69 हजार, 239 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखहून अधिक झाली आहे. 16 दिवसांमध्ये 10 लाख रुग्ण वाढले आहेत. भारतात 7 लाख रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 24 तासांत 912 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत्यूचा आकडा 56 हजार 706 वर पोहोचला आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत देशात 22 लाख 80 हजार 566 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून रिकव्हरी रेट 74.69 आहे. तर मृत्यू दर 1.87 टक्के आहे. मृत्यू दर आणखीन कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे कोरोनाची लस येण्याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. याशिवाय कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर विविध पातळ्यांवर सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत.