जयपूर 20 मार्च : बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कनिका ही काही दिवसांपूर्वीच लंडनहून परतली होती. त्यानंतर ती लखनऊमध्ये झालेल्या एका मेजवानीत उपस्थित होती. त्या मेजवानीला राजकारण आणि इतर क्षेत्रातले 300 दिग्गज उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. त्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे याही उपस्थित होत्या. कनिका ही पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाल्याने वसुंधराराजे यांनी मुलगा दुष्यंत यांच्यासह आपण क्वारंटाइन झाल्याचं जाहीर केलंय.
मुलगा दुष्यंत यांच्या सासुरवाडीच्या लोकांसोबत आपण लखनऊनला एका भोजन समारंभात उपस्थित होतो. त्या कार्यक्रमाला कनिका होती. ती पॉझिटिव्ह असल्याचं पुढे आल्याने मी आणि दुष्यंत सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असून डॉक्टर जे सांगत आहेत त्या सगळ्यांचं पालन करत असल्याचंही त्यांनी ट्विटरवर जाहीर केलं आहे.
कुछ दिन पहले दुष्यंत और उनके ससुराल वालों के साथ मैं लखनऊ में एक डिनर पर गयी थी। कनिका कपूर, जो कि #Covid19 संक्रमित पाई गई हैं, वें भी उस डिनर में बतौर अतिथि मौजूद थीं।
सावधानी के तौर पर मैं और दुष्यंत सेल्फ़-आइसोलेशन में हैं और हम सभी आवश्यक निर्देशों का पालन कर रहे हैं।
कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडनवरून भारतात परतली होती आणि सूत्रांच्या माहितीनुसार तिला कोरोना झाल्याची माहिती तिनं काही दिवस सर्वांपासून लपवून ठेवली होती. असंही म्हटलं जात आहे की काही दिवसांपूर्वी लंडनवरुन भारतात परतल्यावर कनिकानं एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वर्तुळातील अनेक नेते आणि जज यांच्यासह जवळपास 300 लोक सामील झाले होते.
कनिकानं तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता तिच्या सोशल मीडिया अकउंटवरुन शेअर केली आहे.कनिकानं लिहिलं, 'मागच्या 4 दिवसांपासून मला तापाची लक्षण दिसत होती. त्यामुळे मी टेस्ट करुन घेतली आणि माझी COVID-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली. मी पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे.'
कनिकानं पुढे लिहिलं, 'मागच्या काही दिवसांपासून मी ज्या ज्या लोकांना भेटले त्या सर्वांची टेस्ट केली जाणार आहे. 10 दिवसापूर्वी मी घरी आले त्यावेळी माझी एअरपोर्टवर सामान्य पद्धतीनं तपासणी करण्यात आली होती. पण मला 4 दिवसांपूर्वीच या व्हायरसची लक्षणं दिसू लागली. सध्या तरी मी सर्वांना एवढंच सांगेन गर्दीत जाणं टाळा, घरी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. अशी कोणत्याही प्रकारची लक्षण दिसल्यास लगेचच स्वतःची टेस्ट करून घ्या.'