नवी दिल्ली, ता. 17 सप्टेंबर : भारताच्या स्वातंत्र चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान आहे. याच चळवळीतून देशाला अनेक नेते मिळाले. संघाचे पहिले सरसंघचालक हे सुरवातीच्या काळात काँग्रेसचे सदस्य होते आणि त्यांनी स्वातंत्र चळवळीत भागही घेतला असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित संघाचा दृष्टीकोन आणि भारताचं भविष्य या विषयावरच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. तीन दिवस संघानं ही व्याख्यानमाला आयोजित केली असून सरसंघचालक तीनही दिवस त्यात भाषण देणार आहेत. सरसंघचालकांचं अशा प्रकारचं व्याख्यान होण्याची संघाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे. समाजात संघाच्या विचारांचं वर्चस्व निर्माण करणं हा संघाचा कधीच उद्देश नाही असंही ते म्हणाले. मोहन भागवत यांच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देशाच्या स्वातंत्र चवळीत योगदान होतं. पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी विदर्भातल्या जंगल सत्याग्रहात भाग घेतला होता. त्यावेळी अनेक क्रांतिकारकांना त्यांनी मदतही केली होती. संघ ही सर्वात जास्त लोकशाही मानणारी आणि लोकशाहीच्या मार्गानं चालणारी संघटना आहे. संघात कुठलीही गोष्ट आदेश देवून नाही तर सर्वांची मतं विचारात घेऊन लोकशाही मार्गाने होत असते. संघानं एवढं कार्य उभं केल्यानंतरही संघाविषयी अजुनही गैरसमज पसरवले जातात. जोपर्यंत तुम्ही संघात येत नाही तोपर्यंत तुम्हाला संघ कळणार नाही. आम्ही जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. उत्तम चारित्र्याची माणसं निर्माण करणं आणि तसाच समाज निर्माण करणं हेच संघाचं उद्दीष्ट आहे. दुसरं काहीही नाही. याच मनुष्य निर्मितीच्या कामात संघाने झोकून दिलं आहे. समाजात संघाचं वर्चस्व निर्माण व्हावं असा आमचा उद्देश नाही. उलट फक्त संघामुळेच काही होत असेल तर तो आम्ही आमचा पराभव मानतो. कुठली व्यक्ती, संघटना किंवा संस्था नाही तर समाज बलशाली बनावा हेच आमचं उद्दीष्ट आहे. कुणाचा विरोध करण्याचा संकुचित उद्देश डोळ्यासमोर ठेवून संघाची निर्मिती झाली नाही. संघाला समाज जोडायचा आहे. आमचा कुणालाही विरोध नाही. विरोध करायचा असेल तर तो वस्तुस्थिती लक्षात घेऊन विरोध केला पाहिजे. जेव्हा मुल्यांचं पतन होतं तेव्हा राष्ट्राचं पतन सुरू होतं हा इतिहास आहे. आज मुल्यांचं पतन होत असल्यानेच समाजाची घसरण सुरू आहे. भारत विविधतेने नटलेला आहे. ही विविधताच भारताची शक्ती आहे. प्रत्येकाला आपलं वेगळेपण जपण्याचा अधिकार आहे. मात्र हे वेगळेपण जपत असतानाच आपण सर्व एका सुत्रात बांधले गेलो आहेत ही जाणीव निर्माण झाली पाहिजे आणि ती जाणीव म्हणजे हिंदू हा शब्द आहे. संघ आपल्या स्वयंसेवकांना काय करावं हे सांगत नाही. संघ फक्त त्याला संस्कार देतो. संघाचे अनेक स्वयंसेवक आपापल्या क्षेत्रात आपलं योगदान देत असतात आणि समाज बांधणीचं काम करत असतात. संघ हा देणग्यांवर चालत नाही. स्वयंसेवकांच्या गुरूदक्षिणेवरच संघाचं सर्व कामकाज चालतं. आम्ही देणग्या स्वीकारत नाही. आणि कुणी दिल्या तेही घेत नाही. शिस्त ही आमची ओळख आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.