नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : नितीश कुमार यांनी (Nitish Kumar) बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपची साथ सोडली आहे. नितीश कुमार यांनी आजच बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपावला, याचसोबत त्यांनी राज्यपालांना 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं आणि पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा दावा केला. नितीश कुमार यांना स्वत:च्या जेडीयूसह आरजेडी, काँग्रेस आणि डाव्यांनी पाठिंबा दिला आहे. राज्यपालांनी नितीश कुमार यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे, त्यानुसार नितीश कुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
बिहारच्या महागठबंधन सरकारमध्ये काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपद घ्यावं, यासाठी नितीश कुमार आग्रही आहेत. याशिवाय नितीश कुमार यांनी युपीएचे कनव्हेनर (UPA Convener) म्हणजेच संयोजक व्हावे, असं काँग्रेसला वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
2024 लोकसभा निवडणुकीला आता दोन वर्षांपेक्षा कमी काळ शिल्लक आहे. काँग्रेसने जर नितीश कुमार यांना युपीएचे संयोजक व्हायची ऑफर दिली तर शरद पवारांसाठी (Sharad Pawar) हा मोठा धक्का ठरू शकतो. महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार होतं तेव्हा शरद पवारांनी युपीएचं संयोजक व्हावं, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर केली गेली. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष करावं ही मागणीही केली. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी याला जोरदार आक्षेप घेतला.
महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार असताना शरद पवारांनी युपीएला बळकट करण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यादेखील याचाच भाग म्हणून मुंबईमध्ये आल्या होत्या. मुंबई दौऱ्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी युपीएच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच त्यांनी अनेकवेळा काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली.
युपीए आणि विरोधकांची एकी दिसून यावी यासाठी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवारांनी खास प्रयत्न केले. शरद पवार, ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांच्यासह विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली, पण यात सिन्हा यांचा पराभव झाला.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिसलेल्या विरोधकांच्या एकीला उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सुरूंग लागला. विरोधकांनी उपराष्ट्रपतीपदासाठी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली, पण ममतांच्या टीएमसीने या नावाला विरोध केला आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी मतदानातून माघार घेतली. ममतांच्या या माघारीचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा झाला. पश्चिम बंगालमध्ये इडीने केलेल्या कारवाईमुळे ममतांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानातून माघार घेतली का? अशा चर्चाही रंगल्या.
एकीकडे ममतांच्या भूमिकेबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालेलं असताना संजय राऊत यांना इडीने अटक केल्याबाबत शरद पवारांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. संजय राऊतांबाबत शरद पवारांनी मौन बाळगल्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवारांच्या या मौनावर शिवसेनेनं सामनामधून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून राऊतांची अटक आणि काँग्रेस नेत्यांवरच्या इडीच्या कारवाईबाबतच्या विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलं.
युपीए बळकट करण्यासाठी मैदानात असलेल्या शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची आताची भूमिका आणि आता काँग्रेसने नितीश कुमार यांना युपीएचं संयोजक व्हायची दिलेली ऑफर, यामुळे मिशन 2024 साठी विरोधकांची रणनिती नेमकी काय असणार? हे प्रश्न अजूनतरी अनुत्तरितच दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.