नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असताना लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या JEE आणि NEET च्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाच्या महासाथीत परीक्षेला जाणं धोक्याचं असल्याची भावना व्यक्त केली जात असून सरकारला या परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी केली जात आहे. त्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी देशातील विविध मुद्द्यांबाबत उद्या मुख्यमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक घेणार आहेत.
एएनआयने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. यावेळी पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत JEE आणि NEET या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आणि जीएसटीच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. सध्या काँग्रेसमध्ये अध्यक्षाच्या नियुक्तीवरुन जोरदार चर्चा सुरू आहे. राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याने पुढील काही महिने सोनिया गांधी याच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष राहणार आहे.