नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : 2024 लोकसभेच्या निवडणुकांना आता फक्त वर्षभराचाच काळ शिल्लक आहे, या निवडणुकांआधी होणाऱ्या चार राज्यांच्या निवडणुका भाजप तसंच विरोधकांसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे. येत्या वर्षात मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि छत्तीसगडच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपचा विजय होईल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. ‘काँग्रेस सरकारच्या कारभाराचा जनतेला उबग आला आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जनतेमध्ये असुरक्षित वातावरण आहे. विकासाची कामं थांबली आहे. शासनाच्या योजनेचा लाभ प्रामाणिकपणे जनतेला मिळत नाही. याच्या विरुद्ध मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विकास कामाची वेग घेतला आहे. केंद्रामध्ये ज्या विचारधारेचे सरकार आहे, त्याच विचाराचे राज्यात सरकार असेल तर, विकास दुप्पट गतीने होतो. त्यामुळे हे डबल इंजिनचे सरकार प्रत्येक लोक कल्याणकारी योजनेमध्ये जोडलेलं दिसतं’, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. भाजपला उत्तर प्रदेशमधून लोकसभेत 2014 ला 71 आणि 2019 ला 61 जागा मिळाल्या होत्या. 2024 मध्ये मागच्या दोन लोकसभा निवडणुकांपेक्षा चांगले निकाल येतील, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांच्या एकीचे प्रयोग झाला आहे, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये Network18 चे एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उत्तर प्रदेशचा विकासाच्या ब्लू प्रिंटबद्दल योगी आदित्यनाथ खुलासा केला आहे. तसंच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून सल्ला दिला.
‘1947 पासून राहुल गांधी काय करत होते? देशात जातीच्या नावावर आणि समाजाच्या नावावर क्षेत्र आणि भाषेचा आधार घेऊन फाळणी तर काँग्रेसच्या काळात झाली आहे. जे त्यांना वारस हक्काने मिळालं आहे, ते देशाला परत करत आहे. हे तेच करत आहे. राहुल गांधी यांनी आपली नकारात्मक प्रतिमा सोडली तर काँग्रेसला फायदा होईल’ असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी यांना दिला.