चंदीगड, 04 फेब्रुवारी: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी (Punjab Assembly elections) मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Chief Minister Charanjit Singh Channi) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) गुरुवारी उशिरा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा भाचा भूपेंद्र सिंग हनी (Bhupendra Singh Honey) याला अवैध खाण प्रकरणात अटक केली. त्यांचं मेडिकलही जालंधर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाले. त्यांनी जालंधर येथील ईडी कार्यालयात रात्रभर मुक्काम केला असून आज त्यांना मोहाली येथील सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ईडीने सिंग यांना जालंधर कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं. विशेष म्हणजे सीएम चन्नी यांच्या भाच्याच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणेनं नुकताच छापा टाकला होता. यावेळी सिंग आणि त्याच्या साथीदारांकडून मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. सिंग यांची ईडीनं 7-8 तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. हरियाणातील लुधियाना, मोहाली आणि पंचकुला येथे ईडीने छापे टाकले होते. त्यादरम्यान, ईडीने या ठिकाणांहून 10 कोटी रुपये रोख, 21 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोनं आणि 12 लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळ जप्त केलं होतं. सूत्रांनी सांगितलं की, अवैध खाण प्रकरणात मंगळवारी पंजाबमधील मोहाली, लुधियाना, रूपनगर, फतेहगढ साहिब आणि पठाणकोट आणि इतर शहरांमध्ये डझनभर ठिकाणी छापे टाकण्यात आले, जे बुधवारी पहाटे संपले. ते म्हणाले की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार छापा टाकण्यात आला आणि यावेळी तपास यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ही छापेमारी कुदरतदीप सिंग, द पिंजोर रॉयल्टी कंपनी आणि तिचे भागीदार, कंवरमहीप सिंग, मनप्रीत सिंग, सुशील कुमार जोशी, जगवीर इंदर सिंग, रणदीप सिंग, प्रोव्हायडर्स ओव्हरसीज कंन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक आणि भागधारकांच्या विरोधात करण्यात आली ज्यात भूपिंदर सिंग आणि संदीप कुमार यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.