नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: शेतकरी आंदोलनबाबतीत (Farmers Protest) आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रेटा थनबर्ग, रिहाना यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. दरम्यान भारताची प्रतीमा खराब करण्याचा हा प्रयत्न होता, असा आरोप या सेलिब्रिटींवर करण्यात आला. क्लायमेट चेंज अॅक्टिव्हिस्ट ग्रेटा थनबर्ग (Greta Thanberg) ने एक टूल किट ट्वीट केलं होतं, ज्यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकार आणि भारताची प्रतीमा मलिन करण्याचा प्रयत्न होता असा आरोप केला जात आहे. याच प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटने बेंगळुरुतील 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रविला अटक केली आहे. या प्रकरणातील भारतातील ही पहिली अटक आहे.
दिशा रवि ही फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनची संस्थापक सदस्य आहे. 4 फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी टूलकिट संदर्भात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. टूल किट प्रकरणातील ही पहिली अटक आहे. दिशाने माउंट कार्मेल कॉलेजमधून बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशनची पदवी संपादन केली आहे. दिशा सध्या गुड माइल्ड कंपनीशी संबंधित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा तिला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली तेव्हा ती घरून काम करत होती.
दिशा रविचे वडील मैसूर याठिकाणी अॅथलेटिक्सचे कोच आहेत तर आई एक गृहिणी आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने 4 फेब्रुवारी रोजी भादवी कलम 124A, 120A आणि 153 A अंतर्गत बदनामी करणे, गुन्हेगारी कट रचण्याचा आणि द्वेष भडकवण्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला होता.
पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर ग्रेटाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एक ट्वीट केलं होतं. तिने या ट्वीटमध्ये असं म्हटलं होतं की, 'मी शेतकऱ्यांच्या शांतीपूर्ण विरोध प्रदर्शनात त्यांच्या बरोबर आहे. कोणताही द्वेष किंवा धमकी हे बदलू शकत नाही.' हे प्रकरण तेव्हापासून प्रकाशझोतात आले जेव्हा ग्रेटाने शेतकरी प्रदर्शनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते की, 'आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रति एकजूट आहोत.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer protest