पेइचिंग, 17 फेब्रुवारी : चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. चीनमध्येच या व्हायरसमुळे हजारो लोकांचा बळी गेला असून तेथील अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. भारतासह इतर देशही हा व्हायरस आपल्याकडे पोहोचू नये, यासाठी मोठी काळजी घेताना दिसत आहेत. त्यामुळे जगभरातील देशांना भीतीच्या सावटाखाली टाकणारा हा व्हायरस नेमका तयार झाला कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चीनमधील वुहान या प्रांतात कोरोना व्हायरस तयार झाल्याचं बोललं जात आहे. पण आता चीनी वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की, ‘कोरोना व्हायरसचं मूळ वुहानमधील एका फिश मार्केटच्या जवळ असणाऱ्या एका सरकारी रिसर्च लॅबमध्ये असण्याची शक्यता आहे.’ ‘हुबेई प्रांतातील वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (WHDC) नेच या व्हायरसला जन्म दिला असावा,’ असा अंदाज चीनच्या ‘साऊथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’नं म्हटलं आहे. त्यामुळे खरंच चीनच्या रिसर्च लॅबमधून धोकादायक कोरोनाचा जन्म झाला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात 5 जण रुग्णालयात निरीक्षणाखाली राज्यात विविध रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या 64 जणांपैकी 60 जणांचा प्रयोगशाळा नमुना अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. 59 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सध्या पाच जण निरीक्षणाखाली असून त्यातील दोन जण मुंबईत तर तीन जण सांगली येथे भरती आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 220 प्रवाशांपैकी 138 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 38 हजार 131 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.