श्रीहरीकोटा, 18 जुलै : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने चंद्रयान - 3चे तिसरं ऑर्बिट चेंज करण्यात यश मिळालं असल्याची माहिती दिलीय. इस्रोने याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली. चंद्रयान 3 सध्या पृथ्वीभोवती फिरत आहे. काही तासांपूर्वीच महत्त्वाचा टप्पा चंद्रयानाने पार केला. आता यान चंद्राच्या कक्षेच्या दिशेने पुढे जाईल. चंद्रावर ऑगस्टच्या अखेरीस चंद्रयान उतरणार आहे. चंद्रयान 3 दुसऱ्या ऑर्बिटला क्रॉस करून पुढे गेलं आहे. पुढचं ऑर्बिट मॅन्युवरिंग 20 जुलै रोजी होणार आहे. सध्या इस्रोने अंतर किती बदललं हे सांगितलेलं नाही. मात्र एपोजीत बदल झाल्याचं सांगितलं. चौथ्या आणि पाचव्या ऑर्बिट मॅन्यूवरमध्येही एपोजी बदलला जाईल. यामध्ये यान पृथ्वीपासून आणखी दूर जाते. 31 जुलैपर्यंत चंद्रयान 3 हे किमान एक लाख किलोमीटर दूर पोहोचण्याचे लक्ष्य आहे. तिसऱ्या ऑर्बिट मॅन्यूवरिंगआधी चंद्रयान 226 किमी पेरोजी आणि 41 हजार 762 किमी एपोजीच्या ऑर्बिटमध्ये फिरत होते. इस्रोने इंजिन किती काळासाठी ऑन केलं याची माहिती दिलेली नाही. तसंच यानंतर चंद्रयान 3 ला लूनर ट्रान्सफर ट्रॅजेक्टरी म्हणजेच दूर अंतरावरील ऑर्बिटमध्ये सोडलं जाईल. या ऑर्बिटमध्ये ते पाच दिवस फिरेल. चंद्रयान 5 ते 6 ऑगस्ट दरम्यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी तयार होईल. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर प्रोपल्शन सिस्टिम चालू करण्यात येईल. त्याला चंद्राच्या कक्षेच्या दिशेने ढकलण्यात येईल. तर 17 ऑगस्टला प्रोपल्शन सिस्टिम लँडर-रोवरपासून वेगळी होईल. मॉड्युल वेगळं झाल्यानंतर लँडर आणि रोवर चंद्राच्या 100x30 किमीच्या कक्षेत आणलं जाईल. चंद्राच्या कक्षेत जाण्याआधी चंद्रयान 3 चे डिबूस्टिंग करावे लागेल. त्याचा वेग कमी करण्यासाठी चंद्रयान ज्या दिशेने जाते त्याच्या विरुद्ध दिशेला करावे लागेल. हे 23 ऑगस्ट रोजी केलं जाईल. इस्रोसाठी हे काम आव्हानात्मक असणार आहे. यानंतरच यानाची लँडिंग प्रक्रिया सुरू होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.